हैदराबाद – राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या 58व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादचा 7 विकेट्सने धुव्वा उडवत प्लेऑफसाठी मुंबईची चिंता वाढवली आहे. प्रेरक मांकडच्या 64, मार्कस स्टॉयनिसने केलेल्या 40 तर निकोलस पूरनने अवघ्या 13 चेंडूत ठोकलेल्या 44 धावांच्या बळावर हैदाराबादचे 183 धावांचे आव्हान लखनौने 19.2 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.
या विजयाबरोबरच लखनौ प्लेऑफच्या रेसमध्ये पुन्हा एकदा दाखल झाली आहे. लखनौ आता 13 गुणांसह व +0.309 च्या रनरेटने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. अद्याप त्यांचे दोन सामने शिल्लक असून यातील एक सामना त्यांना 16 मे रोजी एकना स्टेडियमवर मुंबई विरुद्ध खेळायचा आहे. जर लखनौने मुंबईसह आपले दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे 17 गुण होतील. ज्यामुळे मुंबईचा प्ले ऑफ खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा होणार आहे.
हैदराबादने ठेवलेल्या 183 धावांचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. सलामीवीर कायल मेयर्सला 14 चेंडूत फक्त 2 धावा करता आल्या. दुसरा सलामीवीर क्विंटन डिकॉकने 19 चेंडूत 29 धावा केल्या खऱ्या मात्र, त्याला मार्कंडेयने बाद करत लखनौला 8 व्या षटकात दुसराधक्का दिला.
मात्र, या दोन धक्क्यातून लखनौला प्रेरक मांकडने सावरले. त्याने मार्कस स्टॉयनिस सोबत तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे लखनौने 15 व्या षटकात 127 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर स्टॉयनिस 16 व्या षटकात बाद झाला.
स्टॉयनिस बाद झाल्यानंतर आलेल्या निकलोस पूरनने हैदराबादला सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. त्याने अवघ्या 13 चेंडूंत 3 चौकर व 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 44 धावा ठोकल्या व हैदराबादच्या हातातून सामना निसटला. हैदराबादकडून ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कडेय व अभिषेक शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
या दोघांनी सामना 12 चेंडूत 14 धावा असा जवळ आणला. त्यानंतर नटराजनच्या 19 व्या षटकात 10 धावा करत शेवटच्या षटकात फक्त 4 धावा शिल्लक ठेवल्या. पूरनने पहिल्या दोन चेंडूतच या धावा पूर्ण करत लखनौला महत्त्वाचा विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने लखनौसमोर विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवले. हैदराबादकडून हेन्री क्लासनने 47 धावांची तर अब्दुल समादने नाबाद 37 धावांची खेळी केली. सलामीवीर अनमोलप्रीतनेही 36 धावांचे योगदान दिले. तर गोलंदाजीत लखनौकडून कृणाल पांड्याने 2 विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ः 20 षटकांत 6 बाद 182 (अनमोलप्रित सिंग 36, एडन मार्करम 28, हेन्री क्लासेन 47-29 चेंडू, अब्दुल सामद 37; कृणाल पंड्या 2-24, आवेश खान 1-30, युधवीर सिंग 1-24, यश ठाकूर 1-28, अमित मिश्रा 1-40) पराभूत वि. लखनौ सुपर जायंट्सः 19.2 षटकांत 3 बाद 185 (क्विंटन डिकॉक 24, प्रेरक मांकड 64-45 चेंडू, मार्कस स्टॉयनिस 40, निकोलस पूरन 44-13 चेंडू; ग्लेन फिलिप्स 1-10, मयंक मार्कडेय 1-39, अभिषेक शर्मा 1-42).