Thomas and Uber Cup 2024 : उबेर कपमधील भारती महिला संघाचा प्रवास संपला आहे. जपानने भारताला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. भारताला उपांत्यपूर्व फेरीत जपानकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. गुरुवारी भारत आणि जपानचे संघ उबेर कपच्या उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने होते.
भारतीय संघ आपल्या गटात दुसरे स्थान मिळवून अंतिम आठमध्ये पोहोचला. दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूशिवाय आव्हानात्मक ठरलेल्या भारतीय संघाला जपानविरुद्ध टिकाव धरता आला नाही आणि उपांत्यपूर्व फेरीत 0-3 असा पराभव पत्करावा लागला. स्टार खेळाडू अश्मिता चालिहा हिने कडवी झुंज दिली, पण युवा आणि अननुभवी भारतीय महिला संघाला जपानचा अडथळा पार करता आला नाही. भारतीय संघ गट टप्प्यात कॅनडा आणि सिंगापूरचा पराभव करून बाद फेरीसाठी पात्र ठरला होता, परंतु अखेरच्या साखळी सामन्यात चीनकडून 5-0 ने पराभूत झाला होता.
उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत 53व्या क्रमांकाची खेळाडू चालिहा हिला 67 मिनिटे चाललेल्या लढतीत जगातील 11व्या क्रमांकाची खेळाडू अया ओहोरीने 21-10, 20-22, 21-15 असे पराभूत केले. चालिहाने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या हाती अपयश आले.
End of one of the most memorable campaigns by women’s team at #UberCup. Proud of the efforts put in by our young squad. Onwards and upwards!
📸: @badmintonphoto#ThomasUberCupFinals#TeamIndia#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/vJu0NWVSzA
— BAI Media (@BAI_Media) May 2, 2024
भारताच्या इशारानी बरुआला माजी जागतिक नंबर वन खेळाडू नोजोमी ओकुहाराने 21-15, 21-12 असे पराभूत केले. तर राष्ट्रीय चॅम्पियन प्रिया के आणि श्रुती मिश्रा या भारतीय जोडीचा जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या नामी मत्सुयामा आणि चिहारू शिदा या जोडीने 21- 8, 21-9 असा पराभव केला आणि यासह उपांत्यपूर्व फेरीतील 3-0 ने झालेल्या पराभवानंतर भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
यासह भारतीय महिला संघ इतिहास रचण्यातही मुकला. भारताने 1957, 2014 आणि 2016 मध्ये तीनदा उबेर कपची उपांत्य फेरी गाठली होती, मात्र विजेतेपद दुरू राहिले. आता उबेर कपच्या उपांत्य फेरीत चीन आणि जपानचे संघ भिडतील. उबेर कपच्या उपांत्य फेरीत दोघेही जवळपास 20 वर्षांनंतर आमनेसामने येणार आहेत.