Lok Sabha Election 2024 – केंद्रीय निवडणूक आयोगाचा जम्मू-काश्मीरचा पाहणी दौरा झाल्यानंतर १४ किंवा १५ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आयोगाने बहुसंख्य राज्यांचा निवडणूकपूर्व आढावा घेतला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जम्मू व काश्मीरमधील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये संपूर्ण माहिती पुरवलेली आहे.
गृह मंत्रालयाने दिलेल्या तपशिलाच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोग जम्मू व काश्मीर या दोन्ही विभागांचा आढावा घेईल. त्यामुळे आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीचीही तयारी केली जात असल्याचे समजते.
दोन्ही निवडणुका एकाचवेळी घेण्यासंदर्भात आयोगाने अजून निर्णय घेतलेला नाही. मात्र, येत्या आठवडय़ातील आयोगाच्या भेटीमध्ये दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याइतके अनुकूल वातावरण आहे का, याची चाचपणी केली जाणार आहे.
आयोगाने उत्तर प्रदेश तसेच, पश्चिम बंगालचाही आढावा घेतला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरहून दिल्लीत परतल्यानंतर आयोग तातडीने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.