करोना संसर्गामुळे ब्रीथ ऍनालायझर यंत्राद्वारे कारवाई बासनात
पुणे – करोना संसर्ग वाढीस लागल्यानंतर राज्यभरातील पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर ब्रीथ ऍनालायझर यंत्राद्वारे करण्यात येणारी कारवाई थांबविली आहे. अशा प्रकारच्या कारवाईत संसर्गाची जोखीम होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई थांबविण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. त्यामुळे यंदा शहरात गटारी अमावस्ये दिवशी मद्यपी वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात आली नाही.
इंग्रजी नववर्षाचे स्वागत तसेच आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी म्हणजेच गटारी अमावस्येला (दीप अमावस्या) मद्यपिऊन वाहने चालविणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईची “ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहीम उघडण्यात येते. आषाढ महिन्यात खवय्यांकडून सामिष पदार्थांचे सेवन केले जाते. मद्यशौकिनांकडून पार्टीचे बेत आखले जातात. या दिवशी मद्यप्राशन करून वाहनचालक रस्त्यावर येतात.
भरधाव वेगामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. त्यामुळे दरवर्षी वाहतूक पोलिसांकडून गटारी अमावस्येच्या आधी दोन ते तीन दिवस शहरात बंदोबस्त वाढविण्यात येतो. प्रमुख रस्ते, चौकांत नाकाबंदी करून ब्रीथ ऍनालायझर यंत्राद्वारे मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यात येते. या यंत्राद्वारे वाहनचालकाने मद्यप्राशन केले किंवा नाही, हे त्वरित समजते. पोलिसांकडून मद्यपी वाहनचालकांवर जागेवरच कारवाई करण्यात येते.
शहरात टाळेबंदी लागू असल्याने फारशी वाहने रस्त्यावर नाहीत तसेच ब्रीथ ऍनालायझर यंत्राद्वारे करण्यात येणारी कारवाई करोना संसर्गामुळे थांबवावी, असे आदेश तीन महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. तसेच करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर मद्यपी वाहनचालकांवर ब्रीथ ऍनालायझर यंत्राद्वारे करण्यात येणारी कारवाई स्थगित करण्यात आली आहे.
– अनिल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा (नियोजन)