पुणे – कोथरूडमधील कुख्यात गुंड निलेश घायवळला वाहतूक पोलिसांना दणका दिला आहे. पुणे-नगर रस्त्यावर वाहतूक नियमन करत असताना एका पाठोपाठ एक ब्लॅक फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ कार आल्यानंतर ब्लॅक काचा आणि फॅन्सी नंबर प्लेटमुळे अडवल्या अन् चौकशी सुरू केली. तेव्हा त्यात घायवळ अन् त्याचे दहा ते पंधरा साथीदार जात असताना दिसून आले. घायवळने फोना-फोनीकरून तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी सहा हजार रुपये दंड ठोकत तो वसूल केला. (pune traffic police took action against the notorious gangster Nilesh Ghaiwal)
नीलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. घायवळच्या टोळीची कोथरुडसह पुण्यात दहशत आहे. त्याच्याविरूद्ध खून, खूनाचा प्रयत्न, मारामारी, दुखापत करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, खंडणीसाठी अपहरण यासारखे एकूण १४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. नुकतीच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पोलीस आयुक्तालयात एकत्रित परेड घेतली होती. त्यांना सज्जड दम देखील दिला होता. दरम्यान, नीलेश घायवळ हा सध्या नगर जिल्ह्यात असतो. त्याठिकाणी तो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो.
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे व त्यांचे सहकारी पुणे-नगर रस्त्यावरील खराडी जकात नाका येथे जड वाहनांवर कारवाई सुरू होती. त्याचवेळी एका पाठोपाठ ब्लॅक कलरच्या काचांना ब्लॅक फ्रेमींगकरून येताना दिसून आल्या. लागलीच वाहतूक पोलिसांनी या गाड्या थांबवल्या. गाड्यांचे नंबर प्लेट देखील फॅन्सी होते.
चौकशी सुरू केल्यानंतर फॉर्च्युनरमध्ये एका गाडीत गुंड निलेश घायवळ व त्याचे साथीदार तर पाठिमागच्या दोन गाड्यात त्याचे इतर सहकारी असल्याचे दिसून आले. त्यांनी पोलिसांनी गाड्या अडविल्यानंतर तेथून जाण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी फोन देखील केले, परंतु, पोलिसांनी तीनही गाड्यांवर प्रत्येकी दोन हजार रुपये असा तीन गाड्यांचा ६ हजार रुपये दंड वसूल केला आणि त्यानंतर या गाड्या सोडण्यात आल्या. प्रथमच एखाद्या गुंडाला वाहतूक पोलिसांनी दणका दिल्याचा प्रकार घडला.