पुणे – करोना संसर्गामुळे येरवडा कारागृह लॉक करण्यात आले आहे. त्यामुळे वकील आणि बंदी यांची होणारी मुलाखत थांबली आहे. खटल्याची असलेली स्थिती बंद्याना सांगणे अवघड बनले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कारागृहातून व्हिडिओ कॉलिंगव्द्वारे वकील आणि बंधी यांच्यात बोलण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वकील, बंदी मुलाखत बंद झाली होती. या पार्श्वभूमीवर आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या बाबतीत खटल्याची स्थिती काय आहे? आणि इतर माहितीसाठी होणारी मुलाखत राज्यातील सर्व कारागृहात स्मार्टफोनच्या माध्यमातून व्हिडीओ कॉलिंगद्वारे सुरू करण्यास परवानगी देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
त्यानुसार वकील आणि विविध गुन्ह्यातील आरोपी – कैदी यांच्यात बोलणे होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार येथील येरवडा मध्यवती कारागृहातून ही सुविधा करावी, अशी मागणी पुणे बार असोसिएशनने (पीबीए) येरवडा मध्यवर्ती कारागृहातील प्रमुखांकडे केली असल्याचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांनी सांगितले.