ठेकेदाराच्या कबुलीनंतरही प्रशासनाचा अजब दावा
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजनच्या अनियमित पुरवठ्यामुळे रुग्णांचा जीव गमवावा लागल्यानंतर यंत्रणेत सुधारणा करण्याऐवजी संबंधित ठेकेदाराला वाचविण्यासाठी यंत्रणा कामाला लागल्याचेच आज समोर आले आहे. विशेष म्हणजे एका बाजूला अतिरिक्त आयुक्त शटडाऊन घेतल्याची कबुली देत आहेत तर डॉ. राजेंद्र वाबळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरू होता, असा खुलासा देत आहेत. यामुळे पालिकेच्या यंत्रणेतील त्रुटी पुन्हा समोर आल्या असून रुग्णांच्या जिवाशी चाललेला खेळ लपविण्यालाच प्राधान्य दिले जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ठेकेदारामार्फत ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. काल (बुधवारी) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजन अचानक बंद पडला होता. रुग्ण व त्यांचे नातेवाईक वारंवार विनंती करत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यानंतर काही प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्यात आला मात्र योग्य मात्रेत त्याचा दाब (प्रेशर) नसल्यामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचा प्रकार घडला होता.
हे वृत्त दैनिक “प्रभात’मध्ये प्रसिद्ध होताच वेगवेगळ्या प्रतिक्रया देण्यात आल्या. यामध्ये अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी शटडाऊन ठेवण्यात आल्याचे सांगितले. तर डॉ.वाबळे यांनी ऑक्सिजनचा पुरवठा सुरू असल्याचे काही नगरसेवकांना सांगितले. तर ठेकेदाराने प्रेशर कमी होते याची कबुली दिली. वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि समन्वयाचा अभाव असताना त्यामध्ये दुरुस्ती करण्याऐवजी सकाळपासून संबंधित ठेकेदाराला वाचविण्याचीच धडपड सुरू असल्याचे दिसून आले. याबाबत पालिकेने खुलासा करतानाही ऑक्सिजन योग्य प्रमाणात पुरवठा होत असल्याचे सांगताना ऑक्सिजनच्या कमी दाबामुळे रुग्ण दगावले नसल्याचे सांगितले आहे. यंत्रणा सुधारणार की महामारीमध्येही ठेकेदारांनाच वाचविणार असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
यंत्रणा योग्य तर “त्या’ डॉक्टरांना का हलविले?
महापालिकेच्या वैद्यकीय विभागात कार्यरत असलेल्या दोन डॉक्टरांना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर वायसीएममध्ये उपचार सुरू होते. अत्यंत सुस्थितीत असलेल्या या डॉक्टरांची प्रकृती वायसीएममध्ये उपचार सुरू असताना अत्यंत खालवली. या डॉक्टरांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात हलवावे लागले. त्यामुळे किती योग्य उपचार सुरू आहेत ही बाब समोर आली आहे. जे आपल्याच डॉक्टरांच्या बाबतीत हलगर्जीपणा करत असतील तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत डॉ. वाबळे खुलासा करतील काय?
शटडाऊनचे पत्र उलब्धच नाही
ऑक्सिजन शटडाऊन करावयाचा झाल्यास त्याबाबत एक प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. त्याबाबत प्रशासकीय निर्णय घ्यावा लागतो. मात्र, शटडाऊन केल्याचे सांगणाऱ्या अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी शटडाऊनच्या निर्णयाचे पत्र गुरुवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत तरी उपलब्ध करून दिले नव्हते.