पुणे – “वी आर जस्ट फ्रेंड!’, “माझ्या नवऱ्याला भेटलास का?’,” बरेच दिवसांनी दिसलेली “ती’ मला बघून सोबतच्या लहान मुलाला म्हणाली,”हा बघ तुझा मामा’…असे किमान शब्दांत स्वत:ची छोटीशी प्रेमकथा कलात्मकरित्या सादर करण्यात नेटिझन्स भलतेच “बिझी’ झाले आहेत. निमित्त आहे, ते सोशल मीडियावर सुरू असलेल्या छोटीशी प्रेमकथा या नव्या ट्रेंडचा.
सध्या लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावरील विविध “चॅलेंज’ हे नागरिकांच्या करमणुकीचे चांगले साधन बनले आहे. मागील अनेक आठवड्यांपासून सोशल मीडियावर विविध ट्रेंडची क्रेझ सुरू आहेत. यामध्ये “चॅलेंज ऍक्सेप्टेड’ या हॅशटॅग अंतर्गत विविध प्रकारचे ट्रेन्ड “हिट’ होत आहेत. आता या सगळ्या चॅलेंजमध्ये नव्याने “छोटी प्रेमकथा’ या ट्रेन्डची भर पडली आहे. आपण करत असणाऱ्या कामाचे किंवा कलाकृतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याकडे अनेकांचा कल असतो.
याव्यतिरिक्त “कविता चॅलेंज’, “साडी चॅलेंज’, “नथ चॅलेंज’, “ओल्ड फोटोचे चॅलेंज’, “ट्रॅडिशनल चॅलेंज’, “विनामेकअप फोटो चॅलेंज’, “सूर्यनमस्कार चॅलेंज’, “फिटनेस चॅलेंज’, “फॅमिली फोटो चॅलेंज’ असे एकनाअनेक चॅलेंजेस फेसबुक, इन्टाग्राम, व्हॉट्स ऍप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेन्डिंग आहेत. “छोटी प्रेमकथा’ हे “चॅलेंज’ स्वीकारत नेटिझन्स “किमान’ शब्दांमध्ये आपली भावना व्यक्त करत आहे. प्रेमकथा या साहित्य प्रकाराला कायमच पसंती मिळत असते. अनेक प्रेमकथांचा समावेश असणारी पुस्तके देखील प्रसिद्ध आणि अजरामर ठरली आहेत. परंतु, या बरोबरीने सोशल मीडियावर “ट्रेन्डिंग’ असणाऱ्या एक-दोन ओळींच्या प्रेमकथांना वाचकांची पसंती मिळत आहे.