संगमनेरमध्ये किराणा मालाची जादा दराने विक्री

संगमनेर  -करोनाच्या प्रतिबंधासाठी देशात लॉकडाऊन सुरू असून या दरम्यान जीवनावश्‍यक वस्तूंच्या पुरवठ्यात कोणतीही कमतरता जाणवणार नाही, असे आश्‍वासन सरकारकडून दिले जात आहे.

मात्र, संगमनेर शहरासह ग्रामीण भागातील काही दुकानदारांकडून माल येत नसल्याचे कारण देत जादा दराने मालाची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहे. पॅकिंगच्या मोठ्या वस्तूमागे 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. तेलाच्या एक किलोच्या पाऊचमागे अनेक दुकानांत चक्क 20 रुपये जास्त घेतले जाताय. तर ज्वारी, गहू व इतर कडधान्यांमागे सर्रास 8 ते 10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय किराणा दुकानात मिळणाऱ्या इतर वस्तूही महागल्या आहेत.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 24 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यातून जीवनावश्‍यक वस्तू वगळल्या आहेत.असे असताना अनेकांना अन्नधान्य मिळण्यास अडचणी येत आहे. चढ्या दराने वस्तूंची विक्री होत आहे. याचा फटका शहरासह ग्रामीण भागात किरकोळ विक्रेत्या दुकानदारांनादेखील बसू लागला आहे.

तसेच, संचारबंदीदरम्यान जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने खुली राहतील, असे शासनाने स्पष्ट करूनही नागरिक जास्तीत जास्त मालाचा साठा करण्यावर भर देत आहेत. परिणामी किराणा मालाच्या दुकानांबाहेर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. त्यापैकी काही दुकानदारांनी संचारबंदीचा फायदा घेत चढ्या दराने मालाची विक्री करत आहे. मालाची साठेबाजी करून नंतर तो वाढीव दराने विकण्यात येत असल्याची तक्रार शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे.संचारबंदीमुळे बाहेर फिरण्यास मनाई असल्यामुळे अनेकजण परिसरातील दुकानांमधून मालाची खरेदी करीत आहेत. शासकीय यंत्रणेने ही बाब गंभीरतेने घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

भाजीविक्रेत्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर
करोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. दुसरीकडे मात्र शहरात गल्लोगल्ली फिरणाऱ्या भाजीविक्रेत्यांमुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसविला जात आहे. यामुळे स्थानिक नागरिकांकडून याला विरोध होत असून पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.