Chinmay Mandlekar| मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरला मागील काही दिवसांपासून त्याच्या मुलाचे नाव ‘जहांगीर’ असल्याने ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर होणारी ही टीका केवळ चिन्मयवरच नाही तर त्याच्या मुलावर आणि पत्नीवर देखील होत आहे. वाईट पद्धतीने टीका केले जात असल्याने चिन्मयची पत्नी नेहाने देखील दु:ख व्यक्त केले होते. यानंतर आता चिन्मय मांडलेकरने एक व्हिडिओ शेअर करत मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कधीही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारणार नसल्याचे त्याने सांगितले आहे. त्याच्या या निर्णयाने चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.
वाढत्या ट्रोलिंगचा कुटुंबाला मानसिक त्रास नको म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे. चिन्मयने दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराय अष्टक’मधील सर्वच सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला.
मात्र सीरिजच्या यापुढील सिनेमांमध्ये तो ही भूमिका करणार नाही असा थेट निर्णय त्याने घेतला. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशाप्रकारे त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रपणे सांगतो की इथून पुढे मी ही भूमिका करणार नाही. कारण मी करत असलेलं काम, भूमिका याचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर वडील, नवरा, कुटुंब प्रमुख म्हणून मला ते जपणं खूप महत्वाचं आहे.
View this post on Instagram
काय म्हणाला चिन्मय मांडलेकर?
“मी अभिनेता आहे पण म्हणून माझ्या मुलाला किंवा पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास सोशल मीडियावरुन होत असेल तर त्याच्याशी मी बांधील नाही. माझ्या कामावरुन मला वाटेल ते बोलू शकता आवडलं नाही आवडलं पण माझ्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे असं मला वाटत नाही. मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेने आतापर्यंत खूप काही दिलं.”
“पण या भूमिकेने जर माझ्या कुटुंबाला, माझ्या ११ वर्षांच्या मुलाला ह्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल तर त्यांची माफी मागून मी जाहीर करतो की इथून पुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही,” असे त्याने व्हिडिओत म्हंटले आहे. दरम्यान, चिन्मयने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अनेक चाहत्यांनी त्याला हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.