लेक्सिंगटन – अमेरिकेची नवोदित टेनिसपटू जेनीफर ब्रॅडी हिने अव्वल मानांकित जील टेकमन हिचा सहज पराभव केला व लेक्सिंगटन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धा तिने प्रथमच जिंकली आहे.
आता तिला मानाच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत सरस कामगिरी करण्याची संधीही मिळाली आहे. करोनाचा धोका कमी झाल्यावर जागतिक टेनिसमध्ये सुरू झालेली ही पहिलीच स्पर्धा होती. अंतिम लढतीत ब्रॅडीने टेकमनवर 6-3 व 6-4 अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली. या विजेतेपदामुळे ब्रॅडीचा आत्मविश्वास दुणावला असून येत्या 31 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेसाठी ती सज्ज बनली आहे. ब्रॅडीने युवा खेळाडू कोको गौफवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
उपांत्य फेरीच्या लढतीत ब्रॅडीने गौफचा 6-2 व 6-4 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. या विजयाद्वारे ब्रॅडीने प्रथमच अमेरिकेतील टेनिस स्पर्धेचीच नव्हे तर डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठत विजेतेपदही प्राप्त केले आहे.