मुंबई : ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा ठराव सोमवारी विधानसभेत मांडण्यात आला. या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या कारवाईविरोधात भाजपा आक्रमक झाली आहे.
यावर आता भाजपचे विधानसभेतील प्रतोद आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’सभागृहाची आयुधे गोठवणे, तारांकित प्रश्न व्यपगत करणे, हरकतीच्या मुद्द्यांवर बोलू न देणे, याबाबत संताप व्यक्त करणारे भाजप सदस्य जेव्हा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत गेले त्यावेळी त्यांना मागे आणण्यासाठी गेलो असताना, अध्यक्षांच्या दालनात कोणत्याही प्रकारची शिवीगाळ झालेली नसताना, उलट पक्षाच्या वतीने मी तालिका अध्यक्षांची स्वतः क्षमा मागितली असतानाही मला निलंबित केले गेले.’
ते पुढे म्हणाले,’ माझा सामना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना करू शकत नाही त्यामुळं त्यांनी ‘नो बाॅल’वर माझी अशी विकेट काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मी चांगला खेळाडू असून जनतेमध्ये जाऊन या तालिबानी कारभार करणाऱ्या पक्षांना उघडे पाडू’ असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.