नियोजनाच्या निवडणुकीपूर्वी महापालिका महाविकास आघाडी

अधिवेशनानंतर सरकार स्थिरस्थावर

उपमुख्यमंत्रिपदावरून कोणताही पेच नाही. खाते वाटप व मंत्रिमंडळाचा विस्तार याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. तिन्ही पक्षाचा किमान समान कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार कामकाज सुरू झाले आहे. परंतु अजूनही सरकार स्थिरस्थावर झालेले नाही. मात्र नागपूरचे अधिवेशन झाल्यानंतर सरकार स्थिरस्थावर होईल, अशी आशा वळसे यांनी व्यक्‍त केली.

नगर  – राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस अशी नव्याने महाविकास आघाडी सत्तारूढ झाली. आता हे बदलते समिकरण लवकरच नगर महापालिकेत अस्तित्वात येण्याचे संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले. येत्या 24 डिसेंबर रोजी होणाऱ्या नियोजन समितीच्या तीन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीकडून याबाबत स्पष्ट भूमिका घेतली जाईल. त्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे अल्पमतात येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. मात्र, नगरमध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर आहे. हा विरोधभास असून याबाबत राष्ट्रवादीची काय भूमिका असेल या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना पक्षाचे प्रभारी दिलीप वळसे म्हणाले की, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यावयाची याबाबत तिन्ही पक्षाची समन्वय समिती निर्णय घेणार आहे. याबाबत लवकरच काय तो निर्णय घेण्यात येईल.

नगरमध्ये पक्षाला न विचारताच राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे. परंतु आता त्यात दुरुस्ती करण्यात येईल. असे काकडे म्हणाले. नियोजन समितीच्या महापालिकेतील तीन जागांसाठी येत्या 24 डिसेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरस आहे. तर राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला तर भाजप अल्पमतात येण्याची शक्‍यता आहे. त्याबाबत काकडे म्हणाले की, या निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादी आपली भूमिका तसेच तिन्ही पक्षाची समन्वय समिती निर्णय घेईल. हा निर्णय महाविकास आघाडी म्हणून राहणार असल्याचे संकेत काकडे यांनी दिले.

या प्रश्‍नांच्या अनुषंगाने वळसे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसह सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबतही महाविकास आघाडीची समन्वय समिती लवकरच निर्णय जाहिर करेल. तीन पक्षाचे प्रमुख नेते आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत याबाबतचा निर्णय स्पष्ट करून स्थानिकपातळीवरील राजकीय समिकरणे लक्षात घेवून त्या पद्धतीने सहकारातील निवडणुकीचे समिकरण ठरले असे ते म्हणाले. जिल्हा परिषदेबाबत बोलतांना वळसे म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे समिकरणे जुळत असल्याने महाविकास आघाडीचा अध्यक्ष होणार आहे. भाजपमध्ये माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांना एकटे पाडण्यात आले असले तरी भाजपला महाविकास आघाडीत घेतले जाणार नाही असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.