निर्भयाच्या न्यायासाठी हजारेंचे 20 पासून मौन

पारनेर  – दिल्लीतील निर्भया प्रकरण गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होऊन निर्भयाला न्याय मिळावा, यासाठी 20 डिसेंबरपासून मौन धारण करणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. हजारे यांनी याबाबतचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.

देशभर सध्या घडत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना अस्वस्थ करत आहेत. अत्याचारांच्या घटनांमध्ये आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हायला हवी. वर्षानुवर्षे आरोपींना शिक्षा होत नसल्याने असे गुन्हे करणारांचे मनोबलही वाढत आहे. सात वर्षांपूर्वी दिल्ली येथे निर्भयावर अत्याचार झाला होता. त्यानंतर संपूर्ण देशात आंदोलने झाली होती. अद्यापही निर्भया न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. याशिवाय देशभर घडलेल्या इतर अशाच अनेक घटनांतील आरोपींनाही कठोर शासन होणे अपेक्षित आहे.

हैदराबाद येथे घडलेली अत्याचाराची घटनाही काळीमा फासणारी आहे. निर्भयासारख्या प्रकरणांत लवकर न्याय मिळत नसल्याने हैदराबाद एन्काउंटरला जनतेचा पाठिंबा मिळतो, असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे. येत्या काळात याबाबत निर्भयाला न्याय मिळण्यासाठी प्रकरणी ठोस पावले उचलणे गरजेचे असून, तसे होताना दिसत नसेल, तर आपण आमरण उपोषण करू व त्याबाबतची तारीख उपोषण करण्यापूर्वी एक आठवडा आधी जाहीर करू, असा इशाराही हजारे यांनी या पत्रात दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.