बनावट आधारकार्डच्या आधाराने जमिनीची परस्पर विक्री

बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री करणारे रॅकेट कार्यरत

गेल्या महिनाभरात तालुक्‍यातील बनावट दस्तावेज बनवून परस्पर जमीन विक्रीच्या पेडगाव आणि कोथूळ अशा दोन घटना उघडकीस आल्या आहेत. बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर जमीनविक्री करणारे रॅकेट तालुक्‍यात कार्यरत असल्याची चर्चा यामुळे जोर धरू लागली आहे. त्यात संबंधित कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

श्रीगोंदा – जमीन मालकाचे बनावट आधारकार्ड बनवून त्याच्या आधारे बनावट दस्तावेज तयार करीत जमिनीची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी मीना किशोर पासलकर (रा. वानवडी, जि.पुणे) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कोथूळ येथील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादी पासलकर या पुणे येथील रहिवासी आहेत. पासलकर यांनी 17 ऑगस्ट 2005 रोजी तालुक्‍यातील कोथूळ येथे धोंडीराम काळू पवार यांच्याकडून गट नं 326/5/2 मधील 1.45 हेक्‍टर शेतजमीन घेतली होती. अभिलेखावर तशी नोंदही झाली होती. काही कामानिमित्त फिर्यादी पासलकर यांनी सदर शेतीचा सातबारा उतारा काढला.

त्यावेळी त्या उताऱ्यावर फिर्यादी पासलकर यांच्या नावाला कंस (आळ) केल्याचा व त्याखाली आशा गोरख लगड यांचे नाव सातबारावर असल्याचे दिसले. याबाबत पासलकर यांनी चौकशी केली असता त्यांची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्याच्या नावावर करण्यात आल्याचे समजले. फिर्यादी पासलकर यांचे बनावट आधारकार्ड 5 जुलै 2019 रोजी खोटे दस्तावेज तयार करून परस्पर ही जमीन विकल्याचा प्रताप उघड झाला. पासलकर यांच्या फिर्यादीवरून जमीन खरेदी घेणाऱ्या आशा गोरख लगड तसेच ओळखदार असलेले राजाराम गोपीनाथ भोसले आणि गोरख तुकाराम लगड (तिघे रा. कोथूळ) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)