बारामती – बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत रखडलेल्या कामाविषयी नगरसेवकांनी आवाज उठवला. शहरातील रखडलेल्या कामांविषयी जाब विचारून प्रशासनाच्या अंदाधुंद कारभाराची पोलखोल केली. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ठेकेदारही मोकाट सुटले आहेत, असा घणाघात नगरसेवकांनी यावेळी केला. त्यामुळे सुस्त प्रशासन निर्धास्त ठेकेदार अशीच अवस्था बारामती नगरपरिषदेची झाली आहे.
नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांच्या अध्यक्षतेखाली बारामती नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. 4) पार पडली. शहरातील विकास कामांसह बारा विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली. बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश कडूसकर रजेवर असल्याकारणाने इंदापूरचे मुख्याधिकारी ठेंगल सभेस उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सत्यव्रत काळे , विरोधी नगरसेवक विष्णुपंत चौधर, अभिजीत जाधव, समीर चव्हाण बिरजू मांढरे, नगरसेविका सुहासिनी सातव, कमल कोकरे, नीलिमा मलगुंडे यांच्यासह सहा नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या.
बारामती शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ते बुजवण्यात यावे, अशी मागणी गेली तीन ते चार महिन्यापासून होत आहे; मात्र याकडे नगर परिषदेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नगरसेवक जय पाटील यांनी केला. तीन-तीन महिने पाठपुरावा करून अधिकाऱ्यांना जाग येत नाही. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ठेकेदारांचे फावले आहे. ठेकेदार अधिकाऱ्यांचे ऐकत नसल्याचे वास्तव त्यांनी यावेळी समोर आणले.
सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाविषयी नगरसेवक संजय संगवी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता अधिकाऱ्यांना त्याबाबत सांगता आले नाही. त्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी या प्रकल्पाविषयी माहिती सांगितली. असे असले तरी अधिकाऱ्यांकडून माहिती अपेक्षित होती असे म्हणत नगरपरिषदेचा पगार नक्की कोण घेतय असा खोचक प्रश्न संघवी यांनी उपस्थित केला. सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा विषय विषयपत्रिकेवर येत असताना त्याचे ऑडिट पत्रक मात्र, दिले जात नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण केली जात आहे. सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पास पूर्णत्वाचा दाखला आहे का? हे देखील महत्त्वाचे आहे. या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीचा नेमका कालावधी कोणता हे तपासणे देखील महत्त्वाचे असल्याचे गटनेते सचिन सातव यांनी स्पष्ट केले. तसेच यावर सुनील सस्ते यांनीही आवाज उठवला. तर या प्रकल्पाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यात येत असल्याचे गुजर यांनी स्पष्ट केले.
अंदाजपत्रक कशाकरिता वाढवले?
हंबीर कुंभार यांच्या घरासमोर रस्ता डांबरीकरण या कामासाठी अंदाजपत्रकीय रक्कम 15 लाख 92 हजार 415 एवढी तर प्रत्यक्ष खर्च 2 लाख 4 हजार 39 रुपये तसेच पाटस रस्ता ते राधाकृष्ण मंगल कार्यालय रस्ता पॅच वर्कसह कार्पेट करणे या कामासाठी अंदाजपत्रकीय रक्कम 19 लाख 63 हजार 714 तर प्रत्यक्ष खर्च 72 हजार 71रुपये एवढा झाला आहे, जर प्रत्यक्षात खर्च कमी होता तर अंदाजपत्रक कशाकरिता वाढविले अंदाजपत्रक तयार करण्यासाठी होणारा खर्च वया गेला असल्याचे नगरसेवकांनी यावेळी निदर्शनास आणले.
या विषयांना मिळाली मंजुरी
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महा अभियान अंतर्गत शहरातील रस्ते विकसित करणे. महिला व बालकल्याण समितीमार्फत प्रतिभा महिला प्रशिक्षण योजना अंतर्गत महिलांसाठी प्रशिक्षण घेणे. सांस्कृतिक केंद्र अद्यावत करणे. सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प मधून तयार होणारा गॅस, मळी, केक विकणे बाबत निर्णय. विविध विकास कामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करणे. तसेच बारामती शहर गंधारी मुक्त करणे आदी विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली.