देहूगाव (रामकुमार आगरवाल)-देहूगाव नवनिर्मित नगरपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूक 2021 सुरू आहे. प्रथम नगरसेवक पदाची पाटी लावण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या काही उमेदवाराकडून होणाऱ्या प्रलोभनाने आणि लक्ष्मी दर्शन घडविले जात असल्याची चर्चा मतदार करीत आहेत.
देहू ग्रामपंचायतीचा कार्यकाल 22 ऑगस्ट 20 रोजी संपुष्टात आला. 8 डिसेंबर 20 रोजी म्हणजे एक वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले होते; मात्र करोना संकट आणि प्रशासकीय कारभार सुरू असल्याने निवडणूक लागली नव्हती. निवडणुका उशीर होत असल्याने इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते.
नुकतेच निवडणूक लागले असून, या निवडणुकीत प्रथम नगरसेवक, नगराध्यक्ष बनण्याची प्रतिष्ठा तसेच नगराध्यक्ष, नगरसेवकपदी प्रथम नाव लावण्याच्या उद्देशाने इच्छुक उमेदवाराने निवडणूक जाहीर करण्यापूर्वी विविध कार्यक्रम आयोजित करीत मतदारांना प्रलोभने देण्यात आले, तर स्वखर्चातून विविध कामे करीत मतदारांची मने जिंकवणसाठी व मते मिळवण्यासाठी समाजसेवक असल्याचे प्रतिबिंब मतदारांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात आले आहे. सुरू असलेल्या निवडणूक रिंगणात 58 जणांनी उडी घेतली होती. विविध पक्षांकडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आले. यामध्ये विविध पक्षांकडून 39 जणांना उमेदवारी मिळाली.
पक्षांकडून तिकीट न मिळाल्याने हिरमोड झालेल्या काही जणांना पक्षांच्या वरिष्ठांकडून आश्वासन दिली गेल्याने गप्प बसविण्यात आल्याचे इच्छुक उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आले आहे. तर काहींनी बंडखोरी करीत निवडणूक रिंगणात आहे. 10 जणांच्या माघारीनंतर 13 प्रभागातून सध्या 48 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
यामध्ये राष्ट्रवादी 13, भाजपा 13, शिवसेना 8, तर कॉंग्रेसचे 5 उमेदवार असून, नऊ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 6 आणि 13 मध्ये फक्त दोन उमेदवार आमने-सामने असून, भाजप आणि राष्ट्रवादी यामध्ये लढत होत असल्याने कोण विजय होणार, तर कोणाचे उमेदवार अधिक विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना काही उमेदवारांनी प्रतिष्ठेपोटी, नगराध्यक्ष तर नगरसेवकाची पहिली पाटी लावण्याच्या उद्देशाने लक्ष्मी दर्शन होत असल्याची जोरदार चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे.
तीर्थक्षेत्र देहू हे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी, कर्मभूमी, योगभूमी आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्र वैराग्याची भूमी असे म्हटले जाते. मात्र प्रतिष्ठेसाठी निवडणुकीत अनेक धनदांडग्यांकडून होणाऱ्या लक्ष्मी दर्शनाची चर्चा सर्वत्र पसरली आहे.