पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नलिका बुजल्या ः रस्त्याची उंचीही वाढली
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत अनेक रस्त्यांचे काम सुरू आहे. काही ठिकाणी रस्ते चांगल्या स्थितीत असतानाही त्यांचे डांबरीकरण करण्यात येत असल्याने डांबरीकरणाचा थर वाढत आहे. त्यामुळे पावसाळी गटारे, तसेच पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या वाहिन्या बुजल्या जात आहेत. रस्त्याची उंचीही वाढत आहे.
शहरात चिंचवड लिंक रोड येथे डांबरीकरण आणि विविध वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी या परिसरात रस्ता खोदला आहे. त्यामुळे दर्शन हॉल परिसरात अनेकदा ऐकेरी वाहतूक सुरू असते. त्याने वाहतुकीची कोंडी होते. तसेच या परिसरातील रस्त्याचे डांबरीकरणही करण्यात येत आहे.
वारंवार डांबराचे थर रस्त्यावर टाकले जात असल्याने रस्त्याची उंचीही वाढली आहे. तसेच पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नलिकाही काही भागात बुजल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या परिसरात थोडा जरी पाऊस आला तरी रस्त्यावर पाणी साठते. या साठलेल्या पाण्यातून नागरिकांना जावे लागते. त्यामुळे डांबरीकरण करताना शास्त्रीय दृष्ट्या योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
डांबरीकरण करण्यापूर्वी रस्ता योग्य पद्धतीने खोदून योग्य प्रमाणात डांबर, खडी याचे मिश्रण असणे आवश्यक आहे. मात्र, हल्ली डांबराचे प्रमाण कमी असते. त्यामुळे रस्ते लगेच उखडतात. त्याचा नाहक त्रास वाहनचालकांना होतो. त्यामुळे योग्य पद्धतीने रस्त्याचे काम व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे.