आईच्या मदतीला कृष्ण अवतरला

पाथर्डी – शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड. प्रताप ढाकणे यांच्यात चुरशीची लढत होत असून, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. राजळे यांच्या प्रचारात त्यांचा मुलगा कृष्ण सक्रिय झाल्याने आईच्या मदतीला कृष्ण अवतरण्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.

सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचाराची धुरा स्वर्गीय राजीव राजळे यांनी सांभाळली. राजीव राजळे यांच्या निधनानंतर आमदार मोनिका राजळे यांची ही पहिली निवडणूक असल्याने त्यांना निवडणूक प्रचाराची एकाकी खिंड लढवावी लागत आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला असतानाच राजळे यांच्या मदतीला मुलगा कृष्णा प्रचारात उतरला आहे. ऑस्ट्रेलियाला शिकत असलेला कृष्णा गेल्या दोन दिवसापासून मतदारसंघात तरुणांची फौज घेऊन आईसाठी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे.

कुठलाही राजकीय अनुभव नसताना आईच्या मदतीला राजकीय मैदानात उतरलेला कृष्णा तरुणांचे आकर्षण ठरत असून सेल्फी काढण्यासाठी तरुणांची झुंबड उडताना दिसते. स्वर्गीय राजीव राजळे यांचा वारसदार म्हणून लोक कृष्णाकडे पाहत आहेत. आई निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना आईला आधार व धिर देण्यासाठीची त्याची धडपड मनाला चटका लावुन जाणार आहे. पाथर्डी शहरात नुकत्याच झालेल्या नामदार पंकजा मुंडे यांच्या सभेपूर्वी कृष्णाने व्यासपीठावर येऊन उपस्थितांना हात उंचावून अभिवादन केले. उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजून त्याला प्रतिसाद दिला. हा क्षण अनेकांना भावूक करणार होता. गेल्या दोन दिवसापासून कृष्णाचा मतदारसंघातील प्रचाराचा झंजावात सुरू असून आईच्या मदतीला कृष्ण उतरला अशी चर्चा रंगली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.