मातब्बर उमेदवारांचा वंचितकडे ओढा
मागासवर्गीय आणि मुस्लिम मतदार ही कॉंग्रेसची पारंपरिक वोट बॅंक. या हुकुमी मतदारांसह बहुजन समाजातील विविध घटकांना वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत मिळवलेली मते आणि विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या यामुळे प्रस्थापितांना धडकी भरत आहे. “वंचित’कुणाला तारणार आणि कुणाला पराभवाची चव चाखायला लावणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “वंचित’ला सक्षम उमेदवार मिळाल्यास युती व दोन्ही कॉंग्रेससमोर तगडे आव्हान उभे राहू शकते.
“वंचित’ने लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात मिळून 1 लाख 86 हजार 858 मते मिळवली. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अरुणा माळी यांना 64 हजार 439 तर, हातकणंगले मतदारसंघात अस्लम सय्यद यांना 1 लाख 23 हजार 419 मते मिळाली. “वंचित’ने विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याची घोषणा केली आहे. यामुळे जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या. वंचित आघाडीचे नेते आंबेडकर यांनी कॉंग्रेसमधील नाराज, बिगर नाराज सगळेच आमच्या संपर्कात आहेत, आणि चर्चेसाठी आमचे दरवाजे खुले आहेत, असे जाहीर करून इतरांना साद घातली आहे.
लोकसभा निवडणुकीला हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, करवीर या मतदारसंघांतील “वंचित’ला मिळालेली मते लक्षणीय आहेत. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात “वंचित’कडे तगडा उमेदवार मिळाल्यास, ज्या त्या मतदारसंघांतील निकालावर परिणाम होऊ शकतो, अशी स्थिती आहे. ऍड. आंबेडकर यांच्या दौऱ्यावेळी कोल्हापूर, सांगलीतील वेगवेगळ्या पक्षातील मंडळींनी त्यांची भेट घेतल्याने आगामी निवडणुकीत वेगळे चित्र आकाराला येऊ शकते.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांसाठी मुलाखती झाल्या. 10 ठिकाणी मिळून 72 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यामध्ये कोल्हापूर उत्तरमध्ये 9, कोल्हापूर दक्षिणमध्ये 8, चंदगडमध्ये 7, शाहूवाडीत 6, करवीरमध्ये 7, हातकणंगलेत 14, राधानगरीत 3, कागलमध्ये 6 आणि शिरोळमध्ये 9 जणांनी उमेदवारी मागितली आहे. हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक 14 उमेदवार “वंचित’च्या तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत. त्या पाठापोठ कोल्हापूर उत्तर, दक्षिण, शिरोळमध्येही इच्छुकांची संख्या मोठी आहे. जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांनी “वंचित’कडे उमेदवारीची मागणी केली आहे.