नवी दिल्ली – तृणमुल कॉंग्रेसच्या खासदाराने आपली नक्कल करून आपण ज्या जाट जमातीचे आहोत त्या जातीचाही त्यांनी अपमान केल्याचा दावा उपराष्ट्रपती धनखड यांनी केला आहे. त्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
प्रत्येक घटना जातीशी जोडली जाऊ नये असे खर्गे यांनी धनखड यांना उद्देशून सांगितले. खर्गे म्हणाले की मला तुम्ही (धनखड) राज्यसभेत अनेक वेळा बोलू देत नाही, मग मी दलित आहे म्हणूनच तुम्ही मला बोलू देत नाही असे म्हणायचे काय असा रोकडा सवाल खर्गे यांनी धनखड यांना उद्देशून विचारला.
धनखड यांच्या वक्तव्या विषयी पत्रकारांशी बोलताना खर्गे म्हणाले की, अध्यक्षांचे काम इतर सदस्यांना संरक्षण देणे हे आहे, मात्र ते स्वतः असे वक्तव्य करत आहेत हे, दुर्देवी आहे. मलाही राज्यसभेत अनेकदा बोलू दिले जात नाही. मग मी दलित आहे म्हणून असे केले जात असल्याचा कांगावा करायचा का असा सवाल खर्गे यांनी उपस्थित केला.
धनखड यांनी सभागृहा बाहेरच्या लोकांना जातीच्या नावावर सभागृहात बोलून भडकावू नये, असे ते म्हणाले. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, संवैधानिक पदांवर असलेले लोक आपल्याच जातीबद्दल बोलतात, हा देशासाठी अत्यंत दुःखाचा दिवस आहे.आता प्रत्येकाने आपली जात जाहीर करणारे लेबल लावून फिरावे का, असा सवाल त्यांनी केला.