जळगाव – मागील काही वर्षांपासून पक्षावर नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. एकनाथ खडसे देखील पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप करत जाहीररीत्या देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरत आहेत. यामुळे खडसे आता निश्चित पक्षांतर करणार अशी चर्चा सुरु आहे.
अशातच आज माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबतच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या फडणवीस यांनी, “एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे आमच्या सर्वांची इच्छा आहे.” अशी प्रतिक्रिया दिली.
“एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण चांगलं कळतं. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे.” असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं.
यावेळी बोलताना फडणवीस यांनी आज एकनाथ खडसे यांच्यासोबत आज कोणतीही चर्चा झाली नसल्याचीही माहिती दिली. योग्य वेळ आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू असंही ते म्हणाले.