दुबई – सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज आयपीएल स्पर्धेतील महत्त्वाचा सामना होत आहे. स्पर्धेतील आव्हान जिंवत ठेवण्यासाठी दोन्ही संघांना विजयाची नितांत आवश्यकता आहे. रॉयल चॅलेंजर बेंगळुरूकडून चेन्नईचा तर राजस्थानकडून हैदराबादचा पराभव झाल्याने दोन्ही संघांसाठी ही लढत जिंकू किंवा मरू अशी बनली आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सांयकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
स्पर्धेच्या इतिहासात तीन वेळा विजेतेपद मिळवणारा चेन्नईचा संघ यंदाच्या स्पर्धेत सूर हरवून बसला आहे. त्यांची फलंदाजी व गोलंदाजी दर्जानुसार होत नसून त्यांना सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. शेन वॉटसन, फाफ डुप्लेसी, अंबाती रायडू, खुद्द कर्णधार महेंद्रसिंग धोनी, नारायण जगदीशन, सॅम कुरेन या फलंदाजांना सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. त्यातील डुप्लेसी व वॉटसन यांनी दोन सामन्यांत सरस कामगिरी केली असली तरीही त्यांना सातत्य राखता आलेले नाही.
मुरली विजय, केदार जाधव व ऋतुराज गायकवाड यांनाही मिळालेल्या संधीचा लाभ घेता न आल्याने त्यांना संघातील स्थान गमवावे लागले आहे. त्याचबरोबर अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने देखील त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा अद्याप पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे धोनीचा संघ सुमार कामगिरीच्या गर्तेत अडकला आहे. गोलंदाजीतही शार्दुल ठाकूर व दीपक चहर यांचा अपवाद वगळता अन्य एकाही गोलंदाजाला आपली चमक दाखवता आलेली नाही.
दुसरीकडे हैदराबाद संघाची देखील अशीच गत आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानेच आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सामन्यात एकांडा शिलेदार म्हणूनच भूमिका वठवली आहे. काही सामन्यांत जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे यांनी चांगली खेळी केली असली तरीही त्यांना सातत्य राखता आलेले नाही. तसेच मधल्या फळीतील फलंदाजी व गोलंदाजी अत्यंत कमकुवत असल्याचेही अनेक सामन्यांतून सिद्ध झाले आहे.
केन विल्यमसन, प्रियम गर्ग, विजय शंकर व अभिषेक शर्मा यांनी अत्यंत बेजबाबदार खेळ केला आहे. त्यांना राजस्थानकडून हातात असलेला सामना गमवावा लागल्याने त्यांचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हानही संकटात सापडले आहे. स्पर्धेच्या इतिहासात त्यांनी एकदा विजेतेपद मिळवले होते. मात्र, त्यानंतर त्यांना आपल्या कामगिरीत सातत्यच राखता आलेले नाही. त्यांची गोलंदाजी देखील अननुभवी आहे. फिरकी गोलंदाज रशिद खानचा अपवाद वगळता अन्य एकाही गोलंदाजाला प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व राखता आलेले नाही.
सॅन्टनरला संधी मिळण्याची शक्यता
न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज व उपयुक्त फलंदाज मिचेल सॅन्टनर याला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. चेन्नई संघात असलेल्या रवींद्र जडेजा व कर्ण शर्मा यांच्याकडून असलेल्या अपेक्षा फोल ठरल्याने सॅन्टनरला खेळवण्याचा अखेरचा पर्याय धोनीकडून वापरला जाण्याची शक्यता आहे.