किशोरभाऊंच्या निधनाने रिपाइंमध्ये पोकळी : ना. रामदास आठवले

सातारा  – महाराष्ट्रात दलित पॅंथरची स्थापना आणि चळवळ वाढविण्यामध्ये किशोरभाऊ तपासे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. त्यांचे आमच्यातून जाणे म्हणजे एकप्रकारे चळवळीतला ढाण्या वाघ हरपल्याची भावना आहे त्याचबरोबर रिपाइंमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात ना. रामदास आठवले यांनी किशोरभाऊ तपासे यांना श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, रिपाइं तपासे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे अभिवचन देखील आठवले यांनी दिले.
साताऱ्यातील जिल्हा बॅंकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत ते बोलत होते. त्यावेळी अविनाश म्हातेकर, खा. उदयनराजे भोसले, नरेंद्र अण्णासाहेब पाटील, पुरुषोत्तम जाधव, अशोक गायकवाड, बाळासाहेब शिरसट, अण्णा वायदंडे, संदीपभाऊ शिंदे आदी. उपस्थित होते.

पुढे बोलताना आठवले म्हणाले, किशोरभाऊंची आज क्षणोक्षणी आठवण येत आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छ. शिवाजी महाराज यांच्या विचारानुसार सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले. एकेकाळी पॅंथरची चळवळ उभी करून गावोगावी शाखा काढण्याचे काम भाऊंनी केले. ते कायम आंबेडकरवादी विचारांचे राहिले. त्यांच्या विचारांमुळे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली. पुढेही पक्षाला सत्तेत वाटा मिळणार होता. त्यामध्ये भाऊंना महामंडळावर संधी द्यायचे निश्‍चित केले होते. मात्र, तरी देखील पक्ष तपासे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. भाऊंच्या दोन्ही मुलांपैकी एकाने राजकारणात यावे. त्यांना पक्षात सन्मानाचे पद देण्यात येईल. दुसऱ्या मुलाच्या नोकरी अथवा व्यवसायासाठी पक्ष मदत करेल, असे आठवले यांनी आवर्जून सांगितले.

खा. उदयनराजे म्हणाले, शिक्षण पूर्ण करून जेव्हा समाजकार्याला सुरुवात केली. तेव्हापासून ते कालपर्यंत 30 वर्षाच्या कालावधीत भाऊंनी मला थोरल्या भावाप्रमाणे मार्गदर्शन केले. त्यांनी मला समाजकारणाची दिशा दिली. वयाने ज्येष्ठ असले त्यांच्या सोबत कायम मित्रत्वाचे नाते राहिले. भाऊंनी मला नगरसेवक ते खासदार प्रवासात कायम मार्गदर्शन व विचार दिले. विशेष म्हणजे भाऊ कधी कुटुंबापुरते मर्यादित राहिले नाहीत. आपले कार्यकर्ते, सहकारी व मित्र यांना त्यांनी कुटुंब मानले. त्यांचा तोच विचार सोबत घेऊन वाटचाल करीत आहे, असे खा. उदयनराजे यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी अविनाश म्हातेकर, नरेंद्र आण्णासाहेब पाटील, पुरुषोत्तम जाधव, अण्णा वायदंडे यांनी देखील मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी जिल्ह्यातून बहुसंख्येने रिपाइं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.