कधी कॉंग्रेस तर कधी भाजप

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर इथे कधी कॉंग्रेस तर कधी भाजपचे पारडे जड असल्याचे दिसून येते. त्यामुळे इथे एकाच एका पक्षाकडे कल दिसून येत नाही. इतर मतदारसंघांत जसे सलग एखाद्या पक्षाला झुकते माप दिले जाते, तसे इथे नाही. त्यामुळे या मतदारसंघाचा अंदाज बांधणे राजकीय विचारवंतांनाही कठीण जाते.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ वास्तविक पाहता कॉंग्रेसचाच बालेबाला होता. तेही स्वाभाविकच होते. कारण स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत सगळीकडेच कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले आणि भंडारा-गोंदियाही त्याला अपवाद नव्हता. त्यानंतर म्हणजे 1977 पर्यंत इथे कॉंग्रेसचेच वर्चस्व होते. 1977 मध्ये आणीबाणीचा फटका कॉंग्रेसला बसला आणि इथली जागा भारतीय लोकदलाचे लक्ष्मणराव निमकर हे जिंकले. 1979 मध्ये पुन्हा केशवराव पारधी हे कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. 1984 मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते पुन्हा निवडून आले. या निवडणुकीत लोकसभेच्या केवळ दोन जागा जिंकणाऱ्या भाजपने 1989 च्या निवडणुकीत इथून बाजी मारली. त्यावेळी खुशाल बोपचे यांना भाजपने उमेदवारी दिली होती.

या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे वर्चस्व बरीच वर्षे आहे. वडील मनोहरभाई पटेल यांच्या पावलावर पाऊल टाकत प्रफुल्ल पटेल राजकारणात आले. 1985पासून ते राजकारणात आहेत. त्यावर्षी ते गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्ष झाले. गोंदियाचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी चांगली लोकप्रियता मिळवली. 1991च्या निवडणुकीत त्यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली. त्यावेळी ते पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर 1996, 1998 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्येही ते कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले. थोडक्‍यात, या मतदारसंघावर प्रफुल्ल पटेल यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. 1999मध्ये जेव्हा शरद पवार, तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा यांनी सोनिया गांधींच्या विदेशी होण्याचा मुद्दा उपस्थित करून कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापन केला, पटेल राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले. त्यावेळी भाजपचे उमेदवार चुन्नीलाल ठाकूर यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यानंतर 2004 मध्ये भाजपच्याच शिशुपाल पटेल यांनी प्रफुल्ल पटेल यांना मोठ्या फरकाने हरवले. पण प्रफुल्ल पटेल राज्यसभेतून संसदेत गेले आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये नागरी उड्डयन मंत्री झाले.

2009 मध्ये या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. नाना पटोले यांनी त्यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्याचा फटका शिशुपाल पटेल यांना बसला आणि त्यांचा इतका मोठा पराभव झाला की त्यांची अमानत रक्कम जप्त झाली. त्यानंतर 2014च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपने नाना पटोले यांना उमेदवारी दिली. पण 2018 मध्ये नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. या वेळी झालेल्या पोटनिवडणुकीत पटोले यांनी घड्याळाच्या चिन्हावर मधुकर कुकडे यांना निवडून आणले. 2014च्या निवडणुकीत भाजपच्या पारड्यात 50.62 टक्के मते पडली होती. त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीत होणार का हा खरा प्रश्‍न आहे. इथे पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेची कसोटी आहे असे मानता येईल.

राजकीय विचारवंतांच्या एका गटाला वाटते की मोदी असतील तर सर्व काही शक्‍य आहे. यावेळी राष्ट्रवाद विरुद्ध परिवारवाद या संकल्पनेवर निवडणूक लढवली जात आहे. एका बाजूला कॉंग्रेसचा परिवारवाद आहे तर दुसऱ्या बाजूला पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या हवाई सर्जिकल स्ट्राईकने देशात राष्ट्रवाद, देशभक्ती हे मुद्दे समोर आले आहेत. याचा फायदा भाजपला मिळू शकतो.

यावेळी भाजपने सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली आहे. मेंढे हे भंडाराचे नगराध्यक्ष आहेत. व्यवसायाने बिल्डर असलेल्या मेंढे यांनी भाजपचे कार्यकर्ते म्हणून राजकारणात प्रवेश केला. 2016मध्ये ते भंडारा नगर परिषदेचे अध्यक्ष झाले. नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी शहराच्या वीजपुरवठा, पाणीपुरवठा, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांकडे जातीने लक्ष दिले. त्यावर प्राधान्य क्रमाने काम केले. असे असले तरी त्यांना एकदम लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षातील कार्यकर्ते आणि स्थानिक नेतेही चकित झाले आहेत. आता सर्वांना बरोबर घेऊन प्रचारकार्य करणे आणि विजय संपादन करणे हे मेंढे यांच्यासमोर मोठे आव्हान असेल. भाजप आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांना वाटत आहे की एका नगराध्यक्षाला एकदम लोकसभेची उमेदवारी देणे योग्य नाही. त्यांच्या मते एखाद्या लहान कामे करणाऱ्या कंत्राटदाराला एकदम बहुमजली इमारत बांधायला सांगण्यासारखे हे आहे. खासदारपदाची जबाबदारी पार पाडणे मेंढे यांना जमेल का अशी शंका त्यांना येते. मेंढे यांना आता उमेदवारी तर जाहीर झाली आहे. आता भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे सर्वांना घेऊन एकत्रितपणे प्रचारकार्य कसे करतात यावर मेंढे यांचा विजय अवलंबून आहे.

तर गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी डॉ. परिणय फुके यांच्याकडे आहे. ते विधानपरिषदेचे आमदार आहेत. पण बावनकुळे आणि फुके यांच्यात समन्वय नसल्यामुळे प्रचारकार्यात अडथळे येत आहेत अशी तक्रार भाजपचे स्थानिक कार्यकर्ते करत आहेत. आता येत्या 3 तारखेला इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे. यानिमित्ताने सर्व एकत्रित कामाला लागतील अशी अपेक्षा आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. आणि राष्ट्रवादीनेही यावेळी अनपेक्षितपणे नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिली आहे. नाना पटोले यांचे समर्थन असलेले मधुकर कुकडे यांनाच उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे न होता प्रफुल्ल पटेल यांचे समर्थन असलेल्या नाना पंचबुद्धे यांना ही उमेदवारी मिळाली आहे. नानांना मत म्हणजे मलाच मत असा प्रचार पटेल करत आहेत. एकूणच या मतदारसंघातील लढत रंगतदार आणि चुरशीची होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.