लेण्याद्रीत शुल्क आकारणीविरोधात उपोषण

पाठिंब्यासाठी स्थानिकांनी पाळला कडकडीत बंद

शिवनेरी  – अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र लेण्याद्री येथे येणाऱ्या गणेश भक्तांकडून पुरातत्व विभागामार्फात प्रती व्यक्ती 25 रुपये शुल्क आकारले जात आहे. या शुल्क आकारणीच्या विरोधात काही तरुणांनी उपोषणाचा पवित्रा अवलंबला असून, गेल्या दोन दिवसांपासून हे उपोषण चालू आहे.

या उपोषणाला लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट गोळेगाव, स्वराज्य निर्माण संस्था, मराठा सेवा संघ, तसेच संपर्ण राज्यातून येणाऱ्या गणेश भक्तांनी पाठिंबा दर्शविला आहे. श्री क्षेत्र लेण्याद्री येथे वर्षभरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.मात्र, येथे येणाऱ्या गणेश भक्तांची पुरातत्व विभाग शुल्क आकारून लूट करत असून, विद्यार्थ्यांकडून देखील दर्शनासाठी शुल्क आकारले जात आहे, त्यामुळे शुल्क आकारणी विरोधातील उपोषणाला लेण्याद्री येथील स्थानिक नागरिक आणि छोट्या-मोठ्या दुकानदारांनी सर्व दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शविला आहे.

लेण्याद्री येथे पुरातत्व विभागाकडून गेल्या कित्येक वर्षांपासून गिरिजात्मकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडून शुल्क आकारले जात आहे. सुरुवातीला दोन रुपये, पाच रुपये, पंधरा रुपये आणि सध्या पंचवीस रुपये प्रती व्यक्ती शुल्क आकारले जात आहे. वास्तविक हे शुल्क डोंगरात असलेली लेणी पाहणाऱ्यांकडून आकारले पाहिजे; परंतु तसे न होता, सर्रास सर्वांकडून शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे गिरिजात्मकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नाहक पैसे मोजावे लागत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले. पुरातत्व विभागाने तिकीटगृह लेण्याद्री मंदिराच्या बाहेर लेण्यांकडे जाणाऱ्या मार्गाच्या ठिकाणी ठेवावे आणि लेणी पाहणाऱ्यांकडूनच शुल्क आकारावे, लेण्याद्री गिरिजात्मकाच्या दर्शनसाठी आलेल्या गणेश भाविक-भक्तांकडून कोणतेही शुल्क आकारू नये असे उपोषण कर्त्यांचे व गणेश भाविकांचे म्हणणे आहे.

 

लेण्याद्रीत शुल्क आकारणीविरोधात उपोषण

इतक्‍या मोठ्या प्रमाणत भाविकांकडून शुल्क आकारून लेण्याद्री येथे कोणत्याही प्रकारची सुधारणा या विभागाकडून होत नाही. मंदिर परिसरातील असलेल्या लेण्यांमध्ये घाणीचे साम्राज्य असून दुर्गंधी परसली आहे. या विभागाचे कर्मचारी हे तिकीटगृहात तिकीट विक्री करून भाविकांची लूट करण्यात व्यस्त असतात; परंतु डोंगरावरील लेण्यामध्ये प्रेमी युगुलांचे चाळे, लेण्यांमधील अस्वच्छता, दुर्गंधी, येथील सुरक्षितता यांकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष नसून, कर्मचारी लेण्यांकडे फिरतही नसल्याचे पाहावयास मिळते.

पुरातत्व विभागाकडून सुविधा नाहीत

मंदिराच्या वर असलेल्या डोंगराची व खडकाची उन, वारा व पाऊस यामुळे झीज झाली असून भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यात या भेगांमध्ये व खडकाच्या कपारींमध्ये पाणी मुरून डोंगराच्या दरडी कोसळण्याची शक्‍यता असून, येथे अपघात होण्याची शक्‍यता आहे. येथे येणाऱ्या गणेश भाविकांच्या जीविताला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण जुन्नर सब सर्कल यांनी त्वरित कार्यवाही करून उपाययोजना करणे आपेक्षित आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.