पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम अर्धवट आहे. हा मार्ग आणखी सुरू व्हायचा आहे. मात्र, मार्गावरील बुधवारपेठ स्थानकाच्या नावावरून वादाला तोंड फुटले आहे. हे नाव रद्द करावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे.
या मागणीसाठी पक्षाकडून कसबापेठ येथील स्थानकाच्या जागी आंदोलन केले. तसेच स्थानकाचे नाव कसबा पेठ स्टेशन असल्याचे फलक झळकवण्यात आले आहेत.
कसबा मतदारसंघ ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मेट्रो प्रशासनाला दोन वर्षांपूर्वी नाव बदलणे संदर्भात पत्र दिले होते. मात्र, महामेट्रोकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने याविरोधात कसबा मतदारसंघातील शिवसैनिक व स्थानिक नागरिकांनी तो बोर्ड तोडून तेथे “कसबा पेठ स्टेशन’ असा बोर्ड लावला.
यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, अनिल जाधव, नागेश खडके, शुभम दुगाणे, राजेंद्र शिंदे, नंदु काळे, जुबेर तांबोळी, कुणाल शेलार, बकुळ डाखवे, गणेश आगरकर, संजय पायगुडे, विनायक गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.