पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ओला-उबेर टॅक्सी चालक संघटनांची नवे भाडे दर निश्चितबाबत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शहरातील प्रमुख दहा संघटना आणि ओला-उबेर कंपनीच्या प्रतिनिधींना चर्चा करण्यासाठी बोलावले होते.
मात्र, मंगळवारच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. तर, याबाबत २८ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे अंतिम निर्णय घेणार असल्याचे आरटीओतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरटीओ कार्यालयात झालेल्या बैठकीत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील, कार्यालयीन अधीक्षक जगदीश कांदे, अधिकारी सुजीत डोंगरजाळ तसेच दहा संघटना आणि उबेर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तर ओला कंपनीचे प्रतिनिधी यावेळी गैरहजर होते. शुक्रवारी (दि. २३) झालेल्या गोंधळाच्या प्रकारानंतर आरटीओ कार्यालयाने आजच्या बैठकीसाठी विशेष खबरदारी घेतली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बैठकीमध्ये दोन पोलीस तैनात होते. त्यामुळे बैठक शांततेत पार पडली.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ओला-उबेर टॅक्सी चालक संघटनांकडून नवे भाडे दर निश्चित करण्याबाबत मागणी करण्यात येत आहे. यासाठी अनेक संघटना प्रयत्न करत आहेत. मात्र, संघटनामंध्ये एकमत होत नाही. श्रेयवादामुळे अनेक संघटना एकमेकांच्या विरोधात बोलत आहे. त्यामुळे अजूनही योग्य असा तोडगा निघालेला नाही.