पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दैनंदिन कामकाजासाठी महापालिकेत येणाऱ्या पुणेकरांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका सहन करावा लागत आहे. कामाच्या नावाखाली वरिष्ठ अधिकारी आणि कामगारही सकाळी साडेअकरा वाजेनंतरच पालिकेत येत आहेत. त्यामुळे कामे घेऊन येणऱ्यांना रिकाम्या हाती जावे लागत आहे. सर्वसामान्य पुणेकरांना सध्या किरकोळ कामांसाठीही दोन-दोन आठवडे महापालिकेत हेलपाटे मारावे लागत आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा आहे. त्यांनी सकाळी ९.४५ वाजता कामावर येणे अपेक्षित आहे. त्यानंतर दुपारी अडीच ते तीन अशी त्यांना जेवणाची वेळ निश्चित आहे. तर, सायंकाळी ६.१५ पर्यंत जाणे अपेक्षित आहे. तर बैठका, व्हिजिट तसेच अधिकारी उपस्थितीनुसार वेळा बदलतात. मात्र, अनेक कर्मचारी आपल्या मर्जीप्रमाणे कामे करत असून, या वेळांना हरताळ फासला जात आहे. तर बिल क्लार्क अथवा कार्यालयीन प्रमुखांना हाताशी धरून उशिरा आल्यानंतरही वेळेवर आल्याच्या स्वाक्षरी केल्या जात आहेत.
कर्मचाऱ्यांची कार्यालयीन दिनचर्या
महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त कार्यलय वगळता अनेक विभागांचे प्रमुख सकाळी अकरानंतरच महापालिकेत येत आहेत. काही कर्मचारी सव्वाअकरा वाजता येतात. त्यानंतर जेमतेम दीड तास काम करून ते दुपारी दीड वाजताच जेवणास जातात. प्रत्यक्षात जेवणाची वेळ अडीच असली, तरी एक वाजेपासूनच कार्यालय बंद करण्याची त्यांची लगबग सुरू होते.
त्यामुळे सकाळच्या सत्रात अवघा दीड तास काम होते. त्यानंतर तीन वाजता कार्यालय उघडले जाते. तर साडेचार वाजता पुन्हा कर्मचारी एकत्र चहासाठी जातात आणि तासभरानंतर येतात. घरी जाण्यासाठी लाॅग-इनसाठी वेळ जातो, म्हणून साडेपाच वाजेपासूनच कामकाज बंद करतात. म्हणजे दुपारच्या सत्रातही दीड ते दोन तासांपेक्षा अधिक काम केले जात नाही. त्यामुळे दिवसभरात केवळ तीन ते साडेतीन तास केले जात आहे.
कामाच्या वेळेत शतपावली
काही महिला कर्मचारी दुपारच्या वेळेत मुख्य इमारतीत शतपावली करत असतात. नवीन विस्तारित इमारतीमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने त्यांची कार्यालये रिकामी आहेत. तसेच तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर असलेले सभागृह बंद असते. त्यामुळे इकडे वरिष्ठ अधिकारी फिरकत नसल्याने अनेक महिला कर्मचारी दुपारनंतर अर्धा ते पाऊन तास चक्क शतपावली करतात.
या विभागातील कर्मचारी असतात गायब
पथ विभाग, भूसंपादन व मालमत्ता, सामान्य प्रशासन, मध्यवर्ती भांडार, पथ, भवन, करसंकलन, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठ, विद्युत विभाग, अतिकमण नियंत्रण