पुणे – करोना महामारीच्या साथीमध्ये गेल्या चार महिन्यांपासून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून फिल्डवर उतरून या लढ्याचे नेतृत्व करणारे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे; परंतु आपण लवकर बरे होऊन पुन्हा सेवेसाठी येऊ, असा विश्वास महापौरांनी ट्विटरवरून पुणेकर नागरिकांपुढे व्यक्त केला आहे.
“थोडासा ताप आल्याने मी माझी कोविड 19 टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारा दरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहीन’, अशी माहिती स्वत: महापौर मोहोळ यांनी ट्विटद्वारे पुणेकरांना दिली आहे.
दरम्यान, शुक्रवारीच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे झालेल्या बैठकीला महापौर उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीला उपस्थित असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. करोनाच्या उपाययोजनांमध्ये महापौर मोहोळ हे सुरूवातीपासूनच सक्रिय आहेत. अनेक बैठका, प्रशासनाबरोबरचा समन्वय, मंत्र्यांबरोबरच्या बैठका, जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय, नागरिकांसाठी आवश्यक उपचार सुविधा, क्वारंटाइन सेंटरची उभारणी, लॉकडाऊनच्या काळात शेल्टर्स होमची उभारणीसह राज्य सरकारकडे आवश्यक सेवा, सुविधांचा पाठपुरावाही ते करत होते.
आतापर्यंत पालिकेतील 179 जणांना बाधा…
महापालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे 179 जणांना करोनाची लागण या आधी झाली आहे. त्यातील 12 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर चार नगरसेवकांना याची लागण झाली आता महापौर पाचवे आहेत