पुणे, दि. 10 – जम्बो कोविड रुग्णालयात आज 50 ऑक्सिजन बेड तयार करून कार्यान्वित करण्यात आले आहेत. याशिवाय शुक्रवारी आणखी 25 ऑक्सिजन बेड, 5 आयसीयू, तर 5 व्हेंटिलेटर बेड तयार करण्यात येणार आहेत.
यामुळे शुक्रवारी संध्याकाळपर्यंत एकूण 85 बेड तयार होतील. येथे नवीन रुग्णांना गुरूवारपासून प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आली. “जम्बो’मध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या 14 रुग्णांना गुरूवारी घरी सोडण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त मनपा आयुक्त आणि जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिली.
जम्बो कोविड रुग्णालयाच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर या सेंटरविषयी विश्वासार्हता निर्माण करणे गरजेचे होते. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. ज्या “लाइफलाइन’ एजन्सीला हे काम देण्यात आले होते, त्या एजन्सीचे काम समाधानकारक नसल्याने या जम्बो सेंटरविषयी अविश्वास निर्माण झाला. त्यामुळे या एजन्सीला येथून बेदखल करून हे काम “मेटाब्रो’ या कंपनीकडे देण्यात आले.
या रुग्णालयाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मंगळवारी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. त्याप्रमाणे 50 ऑक्सिजन बेड गुरूवारी कार्यान्वित करण्यात आले. मागील आठवड्यात 2 सप्टेंबरपासून नवीन रुग्णांना प्रवेश देण्यात आला नव्हता. मात्र, आता प्रवेश सुरू करण्यात आले आहेत.
या 50 बेड व्यतिरिक्त जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडसाठी आवश्यक ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन येथे 11 किलो ऑक्सिजनचा साठा असणारी टाकी सुसज्ज करण्यात आल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.