पुणे – पंडीत दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना “दि. युनायटेड इंडिया इन्श्युरन्स’ कंपनीमार्फत काढण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे. युनायटेड इंडिया’ची सर्वात कमी रक्कमेची निविदा आली आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल.
शहरातील निवासी मिळकतधारक आणि झोपडपटट्टी सेवा शुल्क भरणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण देण्यात येते. यासाठी 4 कोटी 62 लाख 45 हजार रुपये इतका प्रिमिअम भरावा लागणार आहे. त्यामुळे प्रती कुटुंब ही रक्कम 62 रुपये इतकी आहे. मिळकतकराचे उत्पन्न वाढावे यासाठी नियमीत मिळकतकर भरणाऱ्या मिळकत धारक आणि त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांपर्यंत विमा कवच पंडीत दीनदयाळ उपाध्याय विमा योजनेंतर्गत देण्यात येते. आर्थिकवर्ष सुरू होताना 1 एप्रिल ते 31 मार्च अशी या योजनेची मुदत आहे. मात्र, 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने वेळेत कंपनी नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर न झाल्याने दि. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीलाच एक्सटेशनचे पत्र देण्यात आले होते. आचारसंहिता संपल्यानंतर 28 मे रोजी निविदेनुसार पुन्हा याच कंपनीला काम देण्यात आले होते. दरम्यान, याची मुदत यावर्षी 27 मे रोजी संपली. यानंतर जूनमध्ये प्रशासनाने विमा कंपनी निुयक्तीसाठी निविदा काढली. 26 जूनला या निविदेची मुदत संपली. होती त्यानंतर याची फेरनिविदा काढण्यात आली. त्यात दि. युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीचीच निविदा कमीची आल्याने त्यांच्यामार्फतच ही विमा संरक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.