पुणे – झपाट्याने संसर्गित होणाऱ्या करोनाच्या “ओमायक्रॉन’ व्हेरियंटचा थेट पुणे शहर आणि जिल्ह्यात प्रवेश झाला आहे. त्यामुळे आता महापालिका खडबडून जागी झाली असून, उपाययोजनांच्या तयारीला लागली आहे. “ओमायक्रॉन’चे बाधित सापडण्याआधीच अधिकाऱ्यांनी शनिवारी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) आवारातील जम्बो कोविड रुग्णालयाची पाहणी केली.
महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशीष भारती आणि अन्य विभाग प्रमुखांनी ही भेट दिली. या रुग्णालयातील सर्व साहित्य आणि सद्यस्थितीचा आढावा घेऊन “रेडी पोझिशन’ मध्ये ठेवण्याच्या संबधित विभागांना सूचना देण्यात आल्याचे डॉ. भारती यांनी सांगितले.
करोनाच्या पहिल्या लाटेवेळी राज्य सरकार आणि महापालिकेने 800 आसन क्षमतेचे जम्बो कोविड रुग्णालय उभारले. या रुग्णालयात यावर्षी जुलैपर्यंत साडेसहा हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. दुसऱ्या लाटेनंतर रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर यावर्षी 3 जुलैला येथील उपचार सुविधा बंद करण्यात आली आहे. परंतू स्टॅबिलिटी रिपोर्ट आणि करोनाचे रुग्ण सापडत असल्याने रुग्णालयाला मुदतवाढ देण्यात आली आहे.