‘जम्बो’वरील ताण कमी करण्यासाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

स्थिर असलेले रुग्ण सीओईपी वसतिगृहात शिफ्ट

पुणे – करोनातून बरे झालेल्या परंतु अद्यापही देखरेखीची गरज असलेल्या जम्बोमधील रुग्णांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये जम्बो, बाणेरचे जम्बो आणि दळवी रुग्णालयातील रुग्णांचा समावेश आहे.

काही दिवस ऑक्‍सिजनवर ठेवल्यानंतर ज्या करोनाबाधित रुग्णाला ऑक्‍सिजनची गरज लागत नाही. मात्र, पुढील काही दिवस त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, अशा रुग्णांनाच येथे ठेवण्यात येणार असल्याचे, महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

शहरातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि जास्तीत जास्त रुग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून करोनाच्या पहिल्या लाटेत फायदेशीर ठरलेले शिवाजीनगर येथील सीओईपीच्या मैदानावरील जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू केले असून, त्या ठिकाणी 700 बेड कार्यान्वित केले आहेत. याची क्षमता 800 बेडची असल्याने लवकरच उरलेले 100 बेड कार्यान्वित होतील.

या रुग्णालयात आजपर्यंत या ठिकाणी 1300 रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यातील 425 उपचारानंतर बरे झाले. सध्या, या सेंटरमध्ये 650 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच जम्बोमध्ये 10 ते 15 बेड कॅज्युल्टी विभागात आणि 10 बेड तातडीच्या उपचारासाठी आहेत.

मात्र, बरे झालेल्या परंतु देखरेखीची आवश्‍यकता असणाऱ्या रुग्णांना ऑक्‍सिजन बेड देऊन उपयोग नाही. त्याऐवजी त्यांना अन्य ठिकाणी शिफ्ट करून ते बेड अन्य सक्रिय रुग्णांसाठी रिकामे केले जाऊ शकतात, या संकल्पनेतून सीओईपीच्या वसतिगृहात 200 बेडची व्यवस्था केली आहे.

सध्या, शिवाजीनगर जम्बोतील 30, बाणेरच्या कोविड रुग्णालयातील 12, दळवी रुग्णालयातील 8 आणि इतर 10 अशा 60 रुग्णांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

पुणे विभागात बाधित वाढले…
पाच जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 7 लाख 96 हजार 658 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, विभागात करोनाबाधित रुग्णांची संख्या 9 लाख 39 हजार 846 झाली आहे, तर ऍक्‍टिव्ह रुग्ण संख्या 1 लाख 24 हजार 434 इतकी आहे, करोनाबाधित एकूण 10 हजार 897 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.61 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.