पुणे- शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटर सुरू ठेवण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. हे सेंटर बंद करू नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच दिल्या आहेत.
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे सेंटर सुरू ठेवण्याबाबत या सूचना करण्यात आल्या आहेत. वास्तविक येथे करोना बाधितांना उपचारासाठी दाखल करून घेणे कधीच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या ते बंदच आहे. अशा परिस्थितीत ते सुरू ठेवावे की नाही, असा प्रश्न होता.
मात्र, ते बंद करू नये, अशा सूचना आल्याने, त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून, दोन दिवसांत त्याचा अहवाल येणे अपेक्षित आहे.
तो अहवाल आल्यानंतर त्यात सुचवलेल्या बदलांनुसार ते करण्यात येणार आहेत.
याशिवाय हे जम्बो ज्या “मेडब्रो’ या कंपनीला चालवायला दिले आहे, त्या कंपनीशी केलेला करारही संपुष्टात आला आहे. त्यामुळे करार पुढे सुरू ठेवायचा, दुसऱ्या कंपनीला द्यायचा किंवा कसे, या सगळ्याविषयी आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले.