कोलकाता – कॉंग्रेसने लोकसभेतील आपले नेते अधिररंजन चौधरी यांच्यावर पश्चिम बंगालची धुरा सोपवली आहे. अधिर यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात अधिर यांच्याकडे पुन्हा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे त्यांच्याबद्दल पक्षश्रेष्ठींना वाटणारा विश्वास अधोरेखित झाला आहे.
अधिर यांनी 2014 ते 2018 या कालावधीत प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर सोमेन मित्रा यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले. त्यांचे नुकतेच निधन झाल्याने रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षश्रेष्ठींनी पुन्हा अधिर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. आता कॉंग्रेसच्या लोकसभेतील नेतेपदी तेच राहणार की पक्ष इतर नेत्याची वर्णी लावणार याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर अधिर यांची येथे पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये बोलताना त्यांनी आगामी निवडणुकीसाठी डाव्या पक्षांच्या आघाडीशी हातमिळवणी करण्यास कॉंग्रेस राजी असल्याची भूमिका मांडली.
अधिर याआधी प्रदेशाध्यक्ष असताना मागील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि डावी आघाडी एकत्र आली होती. मात्र, मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून बिनसल्याने ते पक्ष स्वतंत्रपणे लढले. दोन्ही निवडणुकांत त्या पक्षांची पीछेहाट झाली.