बीजिंग : जपानमधील हिरोशिमा येथे जी-7 देशांची परिषद झाली. या परिषदेच्या शेवटी जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनाने चीनचा संताप व्यक्त केला आहे. जी-7 देशांच्या संयुक्त निवेदनाविरोधात चीनने राजनैतिक पद्धतीने निषेध केला आहे. जी-7 देशांनी त्यांच्या संयुक्त निवेदनात तैवान, पूर्व आणि दक्षिण चीन समुद्राच्या बाबतीत चीनच्या कारवाईचा निषेध केला आहे. त्याचवेळी, चीनने हे विधान आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप असल्याचे म्हणत त्यावर आक्षेपही नोंदवला आहे.
जी-7 देशांच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात चीनबद्दल बरंच काही नमूद करण्यात आले होते. जी-7 देशांनाही चीनसोबत चांगले संबंध हवे आहेत; परंतु चीनच्या तैवान, पूर्व आणि दक्षिण चीन समुद्राच्या मुद्द्यांबाबतही ते चिंतेत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
जी-7 देशांनी चीनमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबतही सांगत तिबेट, हॉंगकॉंग, शिनजियांगमध्ये मानवी हक्कांची स्थिती वाईट असल्याचे सांगितले. तसेच उईगुर मुस्लिमांना शिबिरात ठेवण्याबाबत चिंता व्यक्त केली.
त्याचवेळी जी-7 देशांच्या संयुक्त निवेदनावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, चीनची चिंता असूनही जी-7 देश चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहेत आणि सतत हल्ले करत आहेत. या आरोपांचा चीन तीव्र निषेध करतो आणि ठामपणे फेटाळतो, असे चीनच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
जी-7 देशांच्या बैठकीत युक्रेनलाही आमंत्रित करण्यात आले होते. युक्रेन विरोधातील युद्ध थांबवण्यासाठी चीन रशियावर दबाव टाकेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.