काठमांडु : एक भारतीय वंशाचा सिंगापुरी गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचल्यानंतर बेपत्ता झाला आहे. यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यासाठी एक मोहीम उघडली आहे. श्रीनिवास सैनी दत्तात्रेय हे गेल्या महिन्यात एव्हरेस्टवर चढण्यासाठी सिंगापूरहून नेपाळला गेले होते. तेथून त्यांचा काहीही ठावठिकाणा अद्यापही लागलेला नाही.
श्रीनिवास यांचा चुलत बंधू भरत याने सांगितले की शिखरावरून खाली उतरत असताना हिमबाधा झाल्यामुळे आणि माऊंटन सिकनेसमुळे श्रीनिवास आजारी पडला. यामुळे तो त्याच्या गटापासून वेगळा झाला आणि 8000 मीटर शिखराच्या तिबेटी प्रदेशात पडला.
सिंगापूरच्या एका टीव्ही चॅनलने भरतच्या हवाल्याने सांगितले की, शेर्पांच्या एका पथकाने शनिवारी श्रीनिवाससाठी शोध मोहीम सुरू केली होती. त्यांचे कुटुंबीय संबंधित सरकारच्या सतत संपर्कात आहे. भरतने सांगितले की श्रीनिवासचे कुटुंब हताश आहे, पण तरीही त्यांनी आशा सोडलेली नाही.
श्रीनिवास (वय 39) हे एका रिअल इस्टेट फर्मचे कार्यकारी संचालक आहेत. 1 एप्रिल रोजी ते नेपाळहून माउंट एव्हरेस्टसाठी रवाना झाले आणि 4 जून रोजी मायदेशी परतणार होते. श्रीनिवास यांनी 26 मे रोजी पत्नीला शेवटचा मेसेज केला होता. आपण एव्हरेस्ट शिखरावर पोहोचल्याची माहिती त्यांनी पत्नीला दिली होती. दरम्यान, सिंगापूरचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय या घटनेच्या घडामोडींवर सतत लक्ष ठेवून आहे.