मुंबई – अजित पवार पक्षातून पुन्हा फुटतील असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना वाटत नव्हते. तर पक्षातील एक बडा खासदारच पक्षात बंड करेल, असे शरद पवार यांना वाटत होते. तसे शरद पवार यांनी मला बोलूनही दाखवले होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, सुनील तटकरे हे इमान राखून नाहीत हे शरद पवार यांना माहीत होते. त्यामुळे शरद पवार यांनी मला सांगितले होत की, सुनील तटकरे हे पुढील ५ वर्षात पक्षात टिकणार नाही. ते शिर्डीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरामध्ये बोलत होते.
सुनील तटकरे हे दिवस रात्र शरद पवार यांच्याकडे येऊन एकच बोलायचे, चला ना भाजपसोबत जाऊ या. २०१९ ला अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला. सुनील तटकरे तेव्हा शरद पवार यांच्या घरी सकाळी ८ वाजता आले.
तुम्हाला वाटते का सुनील तटकरे यांना काही माहीत नाही? सुनील तटकरे यांच्या सारखा नटसम्राट मी पाहिला नाही. तर तुम्ही काय अजित पवार यांना राम मंदिरात जाऊन दर्शन देणार आहेत का? ज्या शरद पवारांच्या घरात राहून तुम्ही राजकरण केले आणि त्यांना तुम्ही घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहात? त्यामुळे तुम्हाला रामाचे दर्शन घेण्याचा अधिकार नाही, असेही आव्हाड यावेळी म्हणाले.
उपमुख्यमंत्री पद हे असंवैधानिक
उपमुख्यमंत्री पद हे असंवैधानिक आहे. अजित पवार यांनी आघाडीच्या सरकारमध्ये असताना बावनकुळे यांना किती मदत केली याची माहिती काढा. अजित पवार यांची वर्किंग स्टाईल वेगळी आहे. त्यांचा पॉलिसी मेकिंगचा एक तरी निर्णय मला त्यांनी सांगवा. शरद पवार यांचे पॉलिसीवर १०० निर्णय घेतले आहेत. अधिकाऱ्यांना लवकर उठवून काही काम होत नाही. अजित पवार यांना झोप लागत नाही त्यामुळे ते सकाळी ६ वाजता उठून काम करतात आणि त्यांचे असे वागणे अधिकाऱ्यांना सुद्धा आवडत नाही, असेही आव्हाडांनी यावेळी म्हटले आहे.