अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुखांना निवडून आणण्याचा निर्धार
औंध – 2009 व 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार जयकुमार गोरे यांना निवडून आणण्यासाठी जिवाचे रान केलेल्या कट्टर समर्थकांनी गोरे यांच्या अहंकारी वृत्तीला कंटाळून त्यांची साथ सोडल्यामुळे जयकुमार गोरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. या सर्वांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.
ऐन निवडणुकीत शिलेदारांनी साथ सोडल्याने श्री. गोरे यांना मोठा धक्का बसला आहे. 2009 आणि 2014 साली माण मतदारसंघातून जयकुमार गोरे यांना निवडून आणण्यासाठी खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जिद्दीने खिंड लढवली होती. अटीतटीच्या लढतीत चिवटपणे झुंज देऊन जयकुमार गोरे यांना निवडून आणले होते. 2009 साली अपक्ष भूमिका घेतलेल्या गोरे यांच्यासाठी पक्षीय आदेश बाजूला ठेवत पक्षाचा “हात’ नसला तरी कार्यकर्त्यांनी हात देऊन त्यांना निवडून आणले.
तसेच 2014 साली पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आक्रमण थोपवून तालुक्यातून जयकुमार गोरे यांना भक्कम आघाडी मिळवून दिली होती. मात्र मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आपल्या फायद्यासाठी सोईस्कर भूमिका घेऊन जातीयवादी पक्षाची सोबत केल्यामुळे स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला. मात्र त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी त्यांना बाजूला ठेवून श्री. गोरे यांनी पर्यायी कार्यकर्ते उभे केले.
लोकसभेच्या निवडणुकीपासून जयकुमार गोरे यांच्यापासून फारकत घेतलेल्या मार्केट कमिटीचे माजी सभापती आशोकआबा गोडसे, माजी पंचायत समितीचे सदस्य नंदकुमार गोडसे, खटाव तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, वडूजचे माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, मार्केट कमेटीचे संचालक काकासाहेब मोरे, युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सचिन घाडगे, रणजित देशमुख, संतोष मांडवे, रत्नजित देशमुख यांनी या निवडणुकीत खटाव तालुक्यातील कॉंग्रेसच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना सापत्न वागणूक देणाऱ्या माजी आमदार जयकुमार गोरे यांना धडा शिकवण्यासाठी विकासाच्या दिंडीत सहभागी होऊन स्वच्छ चारित्र्य आणि विकासाभिमुख चेहरा असलेल्या अपक्ष उमेदवार माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे माजी आमदार जयकुमार गोरे यांच्या गटाला ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. तर अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना दिलासा मिळाला आहे.
गेली दहा वर्षे आम्ही माजी आमदार जयकुमार गोरे यांचे निष्ठेने काम करीत त्यांना खटाव तालुक्यातून मोठी साथ दिली होती. मात्र अहंकाराची त्यांना बाधा झाली असून फक्त मी म्हणेन तीच पूर्वदिशा हा विचार उलथवून टाकण्यासाठी आम्ही स्वाभिमानी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी प्रभाकर देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. विवेक देशमुख