नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल असणाऱ्या सीआरपीएफचे प्रमुख आर. आर. भटनागर निवृत्त झाल्यामुळे या दलाच्या प्रमुख पदाची जबाबदारी तात्पुत्या स्वरूपात आयटीबीपी दलाचे प्रमुख एस. एस. देसवाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडे ही जबाबदारी अतिरीक्त स्वरूपात असेल.
नवीन सीआरपीएफ नेमणुकीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत त्यांच्याकडे या पदाची जबाबदारी राहील असे गृहमंत्रालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. सीआरपीएफचे मावळते प्रमुख भटनागर यांनी अडीच वर्ष या प्रमुख पदाची जबाबदारी पार पाडली. त्यांना सीआरपीएफच्या गुरूग्राम येथील तळावर निरोपाची मानवंदना देण्यात आली. सायंकाळी दिल्लीतील सीआरपीएफच्या मुख्यालयात त्यांना निरोप देण्यात आला. नवीन सीआरपीएफ प्रमुख पुढील आठवड्यातच निश्चीत केले जातील असे गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.