चंदीगड – उत्तरप्रदेशातील पिलभीत जिल्ह्यातील खेरी नौबारामद गावात बंदी आदेश मोडून धार्मिक मिरवणूक काढल्या प्रकरणी तेथील 55 शिखांवर पोलिसांनी खटले दाखल केले आहेत. या प्रकरणाची दखल घेऊन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना हे गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे.
29 डिसेंबर रोजी त्या गावातील शिख बांधवांनी त्यांच्या प्रथेनुसार धार्मिक मिरवणूक काढली होती. त्या मिरवणुकीचा सध्या सुरू असलेल्या सीएए अथवा एनपीआर विरोधातील आंदोलनाशी काहीं संबंध नव्हता. नगर किर्तनाच्यावेळी शिख समाजात अशी मिरवणूक काढण्याची पद्धत असते. पण त्या दिवशी नेमका जमावबंदीचा आदेश असल्याने पोलिसांनी त्या मिरवणूकीत सहभागी झालेल्या 55 शिखांच्या विरोधात बंदी आदेश मोडल्याचा गुन्हा नोंदवला होता. शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांच्या हुतात्मा दिनाच्या निमीत्त होणाऱ्या नगर किर्तनाच्या दिवशी ही मिरवणूक काढण्यात आली होती.