नवी दिल्ली – वेस्ट बँकमध्ये इस्रायलने नव्याने उभारलेल्या वसाहती बेकायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन यांनी ही टीका करत ट्रम्प यांच्या काळातील धोरणाविरोधात मत व्यक्त केले. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्ये अर्जंटिनाच्या परराष्ट्र मंत्री डायना मोन्डिनो यांच्याबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ब्लिंकेन बोलत होते.
वेस्ट बँकेत इस्रायलने नव्याने वसाहत उभारली हे वृत्त निराश करणारे आहे. अशाप्रकारे वेस्ट बँकेत वसाहत निर्माण करणे हे स्थायी शांततेच्या विरोधात असेल, हेच अमेरिकेचे दीर्घकालीन धोरण राहिले आहे. या वसाहती आंतरराष्ट्रीय कायद्याला धरून देखील नाहीत.
यामुळे इस्रायलची सुरक्षा कमकुवतच होईल, सुरक्षा बळकट निश्चितच होणार नाही, असे अमेरिकेचे ठाम मत आहे, असे ब्लिंकेन म्हणाले.
माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाविरोधात बायडेन प्रशासनाने प्रथमच ठाम कृती केली आहे. वेस्ट बँकेतील इस्रायलच्या नवीन वसाहतींमुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होत नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१९ मध्ये म्हटले होते.