मुंबई – तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सध्या महाराष्ट्रात बीआरएस पक्ष वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. या अनुषंगाने राव हे आपल्या निवडक सहकाऱ्यासह पंढरपुरात येऊन विठुरायाचे दर्शन देखील घेणार आहेत.सध्या वारी सुरु आहे. अशात के चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात ऍक्टिव्ह झाले आहेत. वारीदरम्यान ठिकठिकाणी बीआरएस पक्षाचे बॅनर देखील झळकल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र विठुरायाच्या दर्शनापूर्वी केसीआर यांनी मांसाहार केल्याच बोललं जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत राव यांच्यावर निशाणा साधला आहे.
अमोल मिटकरी यांनी आपल्या सोशल मिडियावरून दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये राव यांचे स्वागतासाठीचे होर्डिंग्ज दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये मटणाचे भरलेलं पातेल दिसत आहे. यासोबत मिटकरी लिहितात,”मटनाचा शाही बेत ! पंढरी वारिवर असताना मुख्यमंत्री केसीआर हा प्रकार शोभतो का ? वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका ? पंढरपूर येताना 10 हजार वेळा विचार करा.पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करू नका” असा इशारा यावेळी मिटकरींनी दिला आहे.
केसीआर हे २७ जून रोजी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. यासाठी ते आज हैद्राबादवरुन आपल्या आमदार खासदारांसोबत पंढपुराकडे येण्यासाठी निघाले. येताना उमरगा येथे त्यांच्यासह सहकाऱ्यांची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. मिटकरी यांनी पोस्ट केलेले फोटो त्यांच्या सहकाऱ्यांच्या राहण्यासाठी तसेच भोजनासाठी असलयाचे समजते. यावेळी चंद्रशेखर राव यांनी पंढरपुरात येताना मटणावर ताव मारल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुरु झाली आहे. आता त्यांचा ताफा उमरग्यातून सोलापूरच्या दिशेने रवाना झाला आहे.
मटनाचा शाही बेत! पंढरी वारिवर असताना मुख्यमंत्री केसीआर हा प्रकार शोभतो का ? वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका ? पंढरपूर येताना 10 हजार वेळा विचार करा.
पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करू नका.@TelanganaCMO pic.twitter.com/9eKupfbNZk— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 26, 2023
के चंद्रशेखर राव हे सध्या आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या बीआरएस पक्षाचे कार्यालय नागपूर येथे सुरु केले होते. तसेच महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व महत्वाच्या निवडणूक आपण लढवणार असल्याचे देखील केसीआर यांनी स्पष्ट केला आहे.