लोणी काळभोर (वार्ताहर)- शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राज्यात चांगलीच चर्चेची बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी या मतदारसंघात घडताना दिसत आहे. सध्या या मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे व तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होत आहे.
या लोकसभा मतदार संघातील महत्त्वाचा तालुका म्हणून शिरुर विधानसभा मतदारसंघातील हवेली तालुक्याच्या पूर्व भागाकडे पाहिले जाते. हा भाग सक्षम व सर्वसमावेशक नेतृत्वाच्या अभावामुळे तरुण कार्यकर्त्यांना दिशा देण्यात अपयशी ठरला आहे. या गोष्टीचा फायदा जो उमेदवार आपल्या हुशारीने उठवेल त्याला तालुक्यात मताधिक्य मिळणार आहे.
सर्वच पक्षांचे कार्यकर्ते तालुक्यात असून, एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तालुक्यात मोठ्या संख्येने आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हवेली तालुक्याकडे किंबहुना शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता, कामगार, तरुण, उद्योजक
व्यावसायिक यांच्या प्रश्नांकडे म्हणावे तसे लक्ष न दिल्याने येथील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. असे असले तरी दुसर्या बाजूला मात्र त्यांना सहानभूतीही मिळते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या वादात शरद पवार यांना जी सहानुभूती मतदारांकडून मिळत आहे, तिचा फायदा अमोल कोल्हे यांनाही होत आहे.
आढळराव पाटील यांच्या म्हणण्यानुसार, मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा संपर्क कमी केलेला नाही. खासदार नसतानाही विकास कामांसाठी निधी आणून विकास कामे मार्गी लावलेली आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे निवडणुकीचे निकालाचे समीकरण अवलंबून असणार आहे.
सलग तीन वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राहिलेले आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांना अस्मान दाखवत, शिरूरची लढाई डॉ. अमोल कोल्हेंनी जिंकली होती. त्यावेळी आढळराव पाटलांचे चिन्ह धनुष्यबाण तर पक्ष शिवसेना होता. आता मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश केल्यामुळे घड्याळ चिन्हावर लढत आहेत.
जातीय समीकरणे
25 लाखांहून अधिक मतदार असलेल्या या मतदारसंघात जातीय समीकरणांचे गणित प्रभावी ठरल्याचे गेल्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. मराठा आरक्षणामुळे काही प्रमाणात जागी झालेली या समाजाची अस्मिता आढळरावांच्या पथ्यावर पडेल असे वाटत असले, तरी मराठेतर ओबीसींसह इतर समाजघटक जुळण्याची धास्तीही त्यांच्यासह महायुतीला आहे.
बैलगाडा शर्यतीसह पुणे – नाशिक महामार्ग, पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी, स्थानिक प्रकल्प, औद्योगिकरणाचे जाळे हे मुद्दे दोन्ही बाजूंनी प्रचारात आणले गेले असून, बैलगाडा शर्यतीच्या श्रेयवादाचा लढादेखील ठिकठिकाणी रंगताना दिसत आहे.
विकासाचे मुद्दे गरजेेच
शरद पवार आणि अजित पवार यांच्या सभांचे चोख वेळापत्रक दोन्ही बाजूने केले आहे. महायुतीतील अनेक दिग्गजांच्या प्रचाराविरोधात डॉ. कोल्हे यांच्यासाठी केवळ शरद पवार यांच्याप्रती निष्ठा हा एकमेव आधार सध्यातरी दिसत आहे.
पुणे- सोलापूर, पुणे-नाशिक व पुणे- नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा विषय आणि धरणांतील पाणी वाटपाचा मुद्दाही प्रभावी ठरणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदानस्थळ असलेल्या वढू- तुळापूर येथील स्मारकाच्या निधीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न दोन्हींकडून होत आहे.
2019 चे बलाबाल
राष्ट्रवादी काँग्रेस – डॉ अमोल कोल्हे – 635830 मते
शिवसेना – शिवाजीराव आढळराव पाटील – 577347 मते
विजयातील अंतर – 58483 मते