नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 24 आणि 25 फेब्रुवारी असे दोन दिवस भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी मेलॅनिया ट्रम्प याही भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी 70 लाख भारतीय जमणार असल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे. या दाव्यावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी टीका केली आहेत.
अधीर रंजन चौधरी यांनी म्हंटले कि, ट्रम्पच्या स्वागतासाठी इतक्या भारतीयांनी एकत्र का यावे? ट्रम्प भगवान राम आहेत का? तो फक्त अमेरिकेचा अध्यक्ष आहे. मग त्यांच्यासाठी 70 लाख लोक उभे करण्याची काय गरज आहे? आम्ही भारतीय लोक त्याची उपासना करण्यास उभे राहणार नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रेड डीलसंबंधित वक्तव्याचा समाचार घेताना ते पुढे म्हणाले कि, ट्रम्प आपल्या फायद्यासाठी भारत दौऱ्यावर येत आहेत. तसेच त्यांना व्यापार करार करायचा नाही. त्यांना अमेरिकन उद्योगांचे संरक्षण करायचे आहे. म्हणजेच भारताला अमेरिकेच्या बाजारात येऊ द्यायचे नाही.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान एयरपोर्ट ते मोतेरा क्रिकेट स्टेडियमपर्यंत ७० लाख लोक त्यांचे स्वागत करतील, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे केला होता. भारत दौऱ्यासंबंधी अत्यंत उत्सुक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.