पुणे – टिकटॉक व फोटोग्राफीच्या छंदासाठी महागडे कॅमेरे चोरणाऱ्यास हडपसर पोलिसांनी अटक केली. तो श्रीमंतांच्या लग्नामध्ये चांगले कपडे घालून जात होता. यानंतर मेजवानीवर यथेच्छ ताव मारल्यावर फोटोग्राफर कॅमेरा कोठे ठेवतो हे पहात असे. फोटोग्राफर वधु-वरांचे जेवणाचे फोटो काढायला गेल्यावर त्याची उर्वरित फोटोग्राफीच्या सामानाची बॅग चोरत असे. प्रतीक गव्हाणे (19) असे अटक आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी महेश पवार हे एक व्यावसायीक फोटोग्राफर आहेत. ते मगरपट्टासिटी येथे एका विवाह समारंभात शूटिंग करत होते. विवाहसोहळा सायंकाळी असल्याने लाईटिंगच्या झोतात ते काम करत होते. रात्री उशिरा त्यांना त्यांची फोटोग्राफीची बॅग चोरी झाल्याचे लक्षात आले. बॅगेचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. बॅग गडबडीत कोणाकडे गेली असावी, असे वाटल्याने त्यांनी दोन दिवस सगळ्यांकडे चौकशी केली. मात्र, बॅगेचा तपास न लागल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मंगल कार्यालयातील सर्व सीसीटीव्ही तपासले असताना त्यांना एक व्यक्ती घाईघाईने बॅग घेऊन जाताना दिसला. तपास करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने टिकटॉकचा मोठा छंद आहे, परंतु महागडे कॅमेरे घेऊ शकत नाही. यासाठी शक्कल लढवून श्रीमंतांच्या लग्नात जाऊन कॅमेरे चोरण्याची शक्कल लढवली. यासाठी फोटोग्राफर कॅमेरा कोठे ठेवतो याची माहिती घेतली जात होती.