#IPL2021 : कोलकाताचा मुंबईवर सहज विजय

राहुल त्रिपाठी व व्यंकटेश अय्यर यांच्या आक्रमक अर्धशतकी खेळी

अबुधाबी – राहुल त्रिपाठी व व्यंकटेश अय्यर यांच्या अफलातून आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर त्यांनी यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात वर्चस्व सिद्ध करताना क्वॉलिफायर गटाच्या आशा कायम ठेवल्या.

मुंबईने विजयासाठी दिलेल्या 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अय्यर व शुभमन गिल यांनी आक्रमक सुरुवात केली. या जोडीने डावातील तिसऱ्याच षटकात संघाला 40 धावांची सलामी दिली. गिल आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाल्यावर अय्यरने त्रिपाठीच्या साथीत संघाचा डाव सावरला.

दरम्यान, या जोडीने मुंबईच्या सर्वच गोलंदाजांवर आक्रमण केले. अत्यंत वेगाने धावा जमवताना त्यांनी जसप्रीत बुमराहसारख्या प्रमुख गोलंदाजालाही दडपणाखाली ठेवले. अय्यर अर्धशतकी खेळी करून बाद झाला. त्याने आपल्या 53 धावांच्या खेळीत 30 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 3 षटकार खेचले. दरम्यान, त्रिपाठीनेही अर्धशतकी पल्ला पार केला.

गिल व अय्यर या दोघांनाही बुमराहनेच बाद केले. त्यानंतर त्रिपाठीने कर्णधार इयान मॉर्गनच्या साथीत संघाला विजयासमीप नेले. मॉर्गनही आनावश्‍यक फटका मारून 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र त्रिपाठीने नितीश राणाच्या साथीत संघाचा विजय साकार केला. त्रिपाठी 42 चेंडूत 8 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 74 धावा करून नाबाद राहिला. नितीश राणा 5 धावांवर नाबाद राहिला. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने 3 गडी बाद केले.

सलामीवीर कॉंटन डीकॉक याच्या अर्धशतकी खेळीनंतर रोहित शर्मा व कॅरन पोलार्ड यांनी केलेल्या फलंदाजीनंतर अन्य फलंदाजांनी निराशा केल्याने आयपीएल स्पर्धेतील या दुसऱ्या पर्वातील लढतीत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबईला 20 षटकांत 6 बाद 155 धावांपर्यंतच मजल मारता आली.

रोहितला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याने 30 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. कॅरन पोलार्डने डीकॉकला सुरेख साथ देत संघाला दीडशतकी धावांचा पल्ला गाठून देण्यात हातभार लावला. दरम्यान डीकॉकने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर वेगाने धावा वाढवण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने 42 चेंडूत 4 चौकार व 3 षटकार फटकावताना 55 धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक – 

मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 6 बाद 155 धावा. (कॉंटन डीकॉक 55, रोहित शर्मा 33, कॅरन पोलार्ड 21, इशान किशन 14, कृणाल पंड्या 12, सौरभ तिवारी नाबाद 5, ऍडम मिल्ने नाबाद 1, लॉकी फर्ग्युसन 2-27, प्रसिध कृष्णा 2-43, सुनील नरेन 1-20).
कोलकाता नाईट रायडर्स – 15.1 षटकांत 3 बाद 159 धावा. (शुभमन गिल 13, व्यंकटेश अय्यर 53, राहुल त्रिपाठी नाबाद 74, इयान मॉर्गन 7, नितीश राणा नाबाद 5, जसप्रीत बुमराह 3-43).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.