दुबई – महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ व श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ यांच्यात आज होत असलेला सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघात नवोदित खेळाडूंचा भरणा असल्याने दोन्ही संघांना संघबांधणी व सेकंड बेंचची गुणवत्ता पारखण्याची संधी आहे.
सामन्याची वेळ
(भारतीय प्रमाण वेळेनुसार)
सायंकाळी :- 7ः30,
ठिकाण :- दुबई
थेट प्रक्षेपण :- स्टार स्पोर्टसवर
स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत करत चेन्नईने सुरुवात चांगली केली होती. मात्र, नंतरच्या सामन्यात त्यांना राजस्थानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता दिल्लीविरुद्ध त्यांचे पहिले चार फलंदाज कशी कामगिरी करतात यावर त्यांचे या स्पर्धेतील सेकंड बेंचचे अस्तित्व अवलंबून आहे. अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो याला झालेली दुखापत त्यांची चिंता वाढविणारी आहे. त्याचबरोबर कर्णधार म्हणून धोनीलाही आपली कामगिरी पुन्हा एकदा सिद्ध करावी लागणार आहे.
राजस्थानने उभा केलेला धावांचा डोंगर पार करण्यात त्यांना अपयश आले असले तरीही संजू सॅमसन, फाफ डुप्लेसी यांनी आपली चुणूक दाखवली होती. त्याच सामन्यात धोनीनेही षटकारंची आतषबाजी केली मात्र, तरीही त्यांना पराभव टाळता आला नाही. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमात बदल करून धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येणार का, याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. दिल्लीविरुद्ध अष्टपैलू मिचेल सॅन्टनरला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच लुंगी एन्जीडीचा सूर हरपल्यामुळे जोश हेझलवूड सामन्यात खेळू शकेल.
दुसरीकडे दिल्ली संघालाही या सामन्यात आपल्या नवोदित खेळाडूंना खेळविण्याची संधी मिळाली आहे. पहिल्या सामन्यात त्यांचा पराभव जवळपास निश्चित होता. मात्र, हा सामना पंचांच्या चुकीच्या निर्णयाने टाय झाला व सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने विजय मिळवला. अर्थात तरीही पृथ्वी शॉ, शिखऱ धवन, शिमरन हेटमायर व ऋषभ पंत यांना आलेले अपयश त्यांची डोकेदुखी वाढविणारे आहे. गोलंदाजीतही रवीचंद्रन अश्विन जायबंदी झाल्याने तो खेळणार का हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने अमित मिश्राला संधी मिळण्याची शक्यता आहे.
अम्बाती रायडूबाबत संभ्रम
चेन्नईला मुंबईविरुद्धच्या सामन्यात एकहाती विजय मिळवून देणारा भरात असलेला फलंदाज अम्बाती रायडूला दुखापत झाल्याने तो राजस्थानविरुद्ध खेळू शकला नव्हता मात्र, त्याची दुखापत फारशी गंभीर नसून पुढील सामन्यांसाठी तो उपलब्ध असेल असे संघ व्यवस्थापनाने सांगितले असल्याने दिल्लीविरुद्ध त्याला ऋतुराजच्या जागी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.