Indian Premier League 2024 :- आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापुर्वी बीसीसीआयने खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत मॅचफिट ठरल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, त्याचवेळी महंमद शमी दुखापतीमुळे गुजरात टायटन्सकडून तर प्रसिद्ध कृष्णाही दुखापतीमुळेच राजस्थान रॉयल्ससाठी यंदाचा संपूर्ण मोसम खेळू शखणार नाहीत, अशी घोषणा बीसीसीआयने केली आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. बीसीसीआयने त्याला तंदुरुस्त घोषित केले आहे. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज शमी आणि राजस्थान रॉयल्सचा प्रसिद्ध कृष्णा या मोसमातील स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत.
30 डिसेंबर 2022 रोजी उत्तराखंडच्या रुरकीजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातानंतर १४ महिन्यांच्या खंडानंतर तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील (एनसीए) तंदुरुस्ती कार्यक्रमात यशस्वी ठरल्यामुळे पंतला आता तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. त्याचवेळी बीसीसीआयने वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या डाव्या बाजूच्या क्वाड्रिसेप्स टेंडनवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. लवकरच तो एनसीएमध्ये दाखल होईल. त्यामुळे आयपीएलमध्ये तो सहभागी होऊ शकणार नाही.
याशिवाय वेगवान गोलंदाज शमीलाही आयपीएल मधून वगळण्यात आले आहे. नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याच आली होती. 26 फेब्रुवारी रोजी शमीच्या उजव्या टाचेच्या समस्येवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याच्यावर वैद्यकीय पथकाकडून देखरेख केली जात आहे. मात्र, तो देखील आयपीएल खेळणार नाही, असेही बीसीसीआयने सांगितले आहे.